भुकेलेल्या घोड्यांना मिळाला दोन महिन्यांनंतर खुराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:36+5:302021-05-23T04:39:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : सातारा येथील बैतूल माल या कमिटीने पाचगणी येथील घोडागाडी मालक- चालकांना घोड्यांचा खुराक पाठवून ...

भुकेलेल्या घोड्यांना मिळाला दोन महिन्यांनंतर खुराक
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : सातारा येथील बैतूल माल या कमिटीने पाचगणी येथील घोडागाडी मालक- चालकांना घोड्यांचा खुराक पाठवून दिल्याने घोडागाडी मालक- चालकांना या कोरोना महामारीच्या संक्रमणात खूप मोठा आधार प्राप्त झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घोड्यांना खाण्यासाठी योग्य खुराक नसल्यामुळे घोड्यांना जगवायचे कसे, अशी मोठी समस्या घोडागाडी मालक- चालकांसमोर होती.
कोरोनाच्या या महामारीच्या संकटामध्ये पाचगणी येथील पर्यटन स्थळावरील पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या घोडागाडीचालकांवर सध्या उपासमारीची वेळ आहे. त्यातच पर्यटन व्यवसाय ठप्प असल्यामुळे घोड्यांना खुराक नेमका काय घालायचा, असा यक्षप्रश्न घोडाचालक- मालकांवर दोन महिन्यापांसून आहे.
स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पैसा नाही. मग घोड्यांना काय खायला घालायचे, असा मोठा प्रश्न समोर असताना मात्र सातारा येथील बैतूल माल कमिटीने ही समस्या ओळखून पाचगणी येथे घोड्यांचा खुराक पशुखाद्य पाठवून त्यांची भूक भागविली आहे. या सर्व उपक्रमाने पाचगणीचे घोडागाडी मालक- चालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला.
प्रतिक्रिया :
गेल्या चार महिन्यांपासून पाचगणी पर्यटन ठप्प असल्याने कुटुंबाला जगवण्यासाठी खिशात पैसादेखील नाही. यातच आमच्या घरात दोन ते तीन घोडे आहेत. या घोड्यांना जगवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसेदेखील नाहीत. लॉकडाऊन कधी संपेल, हे सांगता येणार नाही. मात्र, या काळात सातारा बैतूल माल कमिटीने आमच्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या घोडा याची भूक भागवली, हे आमच्यासाठी खूप मोलाची मदत आहे.
-इम्रान शेख, घोडा मालक, पाचगणी
फोटो : २२पाडळे
फोटो ओळ : पाचगणी येथील घोड्यांसाठी सातारा येथील बैतूल कमिटीतर्फे खुराक वाटप करण्यात आले.