भुकेने व्याकूळ कोल्ह्याचा अखेर मृत्यू !
By Admin | Updated: April 4, 2015 00:03 IST2015-04-03T22:17:24+5:302015-04-04T00:03:14+5:30
वनकार्यालयात अखेरचा श्वास : उपासमार, शरीरातील पाणी कमी झाल्याचा परिणाम, आगाशिव डोंगरात अंत्यसंस्कार

भुकेने व्याकूळ कोल्ह्याचा अखेर मृत्यू !
कऱ्हाड : करवडी कॉलनीत बेशुद्धावस्थेत आढळून आलेला कोल्हा भुकेचा बळी ठरला. गुरुवारी सकाळी त्याच्यावर कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. आगाशिवनगर येथे वनकार्यालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. शरीरातील पाणी कमी झाल्याने कोल्ह्याला प्राण गमवावे लागले.करवडी कॉलनी येथील भारमल यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी अचानक कोल्हा आढळून आला. भारमल यांच्या घरापासून काही अंतरावर उसाचे शेत आहे. या शेतातून तो बाहेर पडला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. घरासमोर अचानक कोल्हा आल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिक घाबरले. मात्र, नागरिकांनी काही हालचाल करण्यापूर्वीच तो कोल्हा जमिनीवर कोसळला. नागरिकांनी याबाबतची माहिती सर्पमित्र सलीम मुल्ला आणि विनायक दळवी यांना दिली. त्यांनी अॅनिमल वेलफेअर आॅफिसर अमोल शिंदे यांना याबाबत कळविल्यानंतर अमोल शिंदे तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या कोल्ह्याला इलेक्ट्रॉल पावडर पाजली. काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या कोल्ह्याला घेऊन अॅनिमल आॅफिसर शिंदे यांच्यासह काही नागरिक कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आले. त्याठिकाणी डॉ. बोरडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्ह्यावर उपचार केले. उपचारानंतर त्याला वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ताब्यात घेतलेला कोल्हा घेऊन वनाधिकारी आगाशिवनगर येथील कार्यालयात गेले. त्याठिकाणी कोल्ह्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्याच्यासमोर टाकलेले मांसाचे तुकडेही कोल्ह्याने खाल्ले नाहीत. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वन कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस मृत कोल्ह्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
संबंधित कोल्हा गत काही दिवसांपासून उपाशी होता. त्यातच त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली. त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्याला दुसरा कोणता आजार नसल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, शरीराच्या अंतर्गत भागात एखादी जखम झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- भरत पाटील, वनाधिकारी, कऱ्हाड
वनविभागाकडून पंचनामा
मृत कोल्ह्याचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. त्याचे वय सुमारे दोन वर्षे असून, उंची दीड फूट तर लांबी अडीच फूट असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यत: कोल्ह्याची नर, मादी आणि पिले एकत्र राहतात. त्यांचे वावरक्षेत्र निश्चित असते. तसेच शहर किंवा खेडेगावाच्या आसपास राहणे या प्राण्याला पसंत पडते, असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे.
वनविभागाकडून पंचनामा
मृत कोल्ह्याचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. त्याचे वय सुमारे दोन वर्षे असून, उंची दीड फूट तर लांबी अडीच फूट असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यत: कोल्ह्याची नर, मादी आणि पिले एकत्र राहतात. त्यांचे वावरक्षेत्र निश्चित असते. तसेच शहर किंवा खेडेगावाच्या आसपास राहणे या प्राण्याला पसंत पडते, असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे.