‘त्रिशंकू’त सुविधा देऊ : वेदांतिकाराजे
By Admin | Updated: November 9, 2014 23:33 IST2014-11-09T21:48:35+5:302014-11-09T23:33:10+5:30
दारुबंदीसाठी प्रयत्न करू... --आज कचरा हटाव मोहीम

‘त्रिशंकू’त सुविधा देऊ : वेदांतिकाराजे
सातारा : विसावा पार्क या त्रिशंकू भागाला रस्ते, पाणी, गटारे, पथदिवे या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. येथील त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात तातडीने मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. येत्या दोन दिवसांत पाहणी करून कामांचा आराखडा तयार करण्यात येणार असून महिनाभरात कामे पूर्ण होतील, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, नागरिकांनी सहकार्य केले तरच प्रशासन काम करू शकते. त्यामुळे त्रिशंकू भागातील नागरिकांनी, प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करून या भागाचा विकास साधावा, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
विसावा पार्क, यशवंत कॉलनी, भोसले मळा, देवी कॉलनी, देशमुखनगर, अॅपेक्स हॉस्पिटल परिसर, शाहूनगर, साई कॉलनी आदी परिसर त्रिशंकू भागात येतो. या परिसरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी समस्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सहकार्याने सोडविण्यासाठी वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवराज माळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता बी. ए. पाटील, तुकाराम अष्टेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे, पंचायत समितीचे एस पी. सानप, विजय घारे आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत फिरोज पठाण, अजय कदम, विजय जाधव, एस. पी. करपे, रवींद्र महाडिक, विजय घाडगे, अरुण जाधव, रवी पवार, प्रकाश भोसले, राहुल साबळे, सार्थक वाघमळे, नीलेश देशमुख, विकास शेटे, महेश ठोंबरे, अमित कापसे, सुजित जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
यापूर्वी त्रिशंकू भागातील रस्ते आमदार फंडातून झाले होते. आताही आमदार फंड अथवा अन्य कोणत्याही योजनेतून रस्त्यांची आणि गटारांची कामे पूर्ण करावीत, अशी सूचना वेदांतिकाराजे यांनी अधिकाऱ्यांना केली.
अतिक्रमणामुळे रस्ता आणि गटारांची कामे करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले. अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे टोलवाटोलवी करु नका, असे फटकारुन संबंधित अधिकाऱ्यांनी या भागातील रस्ते, गटारे तातडीने पूर्ण करावेत, असेही वेदांतिकराजे यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत या भागातील रस्त्यांचे मोजमाप घेऊन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, असे अभियंता माळी यांनी यावेळी सांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आज कचरा हटाव मोहीम
या भागातील कचरा उचलण्यासाठी महिला बचत गटाने ३० रुपये प्रतिमहिना दराने घंटागाडी सुरू केली आहे. मात्र, तरीही काही लोक, दुकानदार रस्त्यावर आणि या परिसरातील एका विहिरीच्या ठिकाणी कचरा टाकत आहेत. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच विहिरीलगत साचलेल्या कचऱ्याचा ढिग हटविण्यासाठी सोमवार, दि. १० रोजी सकाळी ८ वाजता वेदांतिकाराजे यांच्या उपस्थितीत कचरा हटाव मोहीम राबवण्याचा निर्णय यावेळी झाला. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन विसावा पार्क परिसर कचरामुक्त करावा, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
दारुबंदीसाठी प्रयत्न करू...
काही नागरिकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील देशी दारू दुकानामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार वेदांतिकाराजे यांच्याकडे केली. नागरिकांनी संघटित होऊन दारू दुकान हटविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. यानंतर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे हे दुकान हटविण्याची मागणी आपण करू आणि या परिसरात दारूबंदी करू, असे आश्वासन वेदांतिकाराजे यांनी नागरिकांना दिले.