मोरणा पठारावर शेकडो ट्रक लाकूड तस्करी
By Admin | Updated: November 9, 2015 23:29 IST2015-11-09T21:32:02+5:302015-11-09T23:29:31+5:30
पाटण तालुका : जंगल तोडून पवनचक्क्यांना दिली जागा

मोरणा पठारावर शेकडो ट्रक लाकूड तस्करी
पाटण : मोरणा पठारावरील शेकडो हेक्टर वनजमीन पवनचक्क्यांचे टॉवर उभे करण्यासाठी वनविभागाने दिली; मग त्या जमिनीतील हजारो झाडांची कत्तल स्वत: वनविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आली. यांत्रिक कटरच्या साह्याने झाडे तोडून शेकडो ट्रक साठा करून त्या लाकडाचा लिलाव लाकूड तस्करांना केला. सध्या याच लाकूडसाठ्याची परवान्याच्या नावाखाली वाहतूक सुरू असून, कऱ्हाड, इस्लामपूर, सांगलीकडील वखारी व कारखान्याच्या बॉयलरला दुप्पट दराने लाकूड विकण्याचे काम सुरू आहे. पाटण वनविभाग व वनकर्मचाऱ्यांना सतत लाकूड तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेरले आहे. ज्यांच्या नावावर बेकायदा लाकूड तस्करी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. तेच वनअधिकाऱ्यांच्या मर्जीतले आहेत. अशाच संबंधातून पाचगणी वनक्षेत्रातील शेकडो ट्रक लाकूडसाठा वनविभागाने तस्कऱ्यांना दिला आहे. तत्पूर्वी वनजमिनीतील उंच-उंच झाडे तोडताना वनविभागाचे हात थरथरले कसे नाहीत, असा सवाल जनतेतून केला जात आहे. दुसरीकडे मग सह्याद्री व्याघ्रप्रकल्प आणि इको सेन्सिटिव्ह झोनचे नाटक कशासाठी? अशा वर्दीतल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी
मोरणा परिसरातून होत आहे. (प्रतिनिधी)
वनविभागाचे तपासणी नाके बनले वसुलीनाके
घाटमाथा, रासाटी, पाटण, नवारस्ता, विजयनगर अशा ठिकाणी वनविभागाने तपासणी नाके उभे केले आहेत. कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील हे नाके खादाड बनले असून, हॉटेल्स, ढाब्याप्रमाणे दिवसा बंद आणि रात्र झाली की न चुकता उघडे असे चित्र दिसते. अशा नाक्यावरील कर्मचारी लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रककडून फक्त वसुली करण्याचे काम करताना दिसत असल्याच्या तक्रारी आहेत.
पाचगणी वनक्षेत्रातील तो लाकूडसाठा व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे विकला आहे. त्याची वाहतूक करण्यासाठी परवाना दिला आहे; पण रात्रीची वाहतूक केली जाते. याबाबत काही सांगता येणार नाही.
- व्ही. आर. काळे,
वनक्षेत्रपाल, पाटण