महाबळेश्वरात थांबली शेकडो टॅक्सींची चाके
By Admin | Updated: August 8, 2016 23:39 IST2016-08-08T22:49:45+5:302016-08-08T23:39:18+5:30
पाच पॉइंट बंद : पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाचा निर्णय; पावसाचे प्रमाण कमी होताच पुन्हा खुले करणार

महाबळेश्वरात थांबली शेकडो टॅक्सींची चाके
महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे यंदा पावसाने चांगलाच कहर केला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाबळेश्वर येथे तब्बल १५०० ते १६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे
प्रमाण पाहता व पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाच्या वतीने येथील पाच पॉइंट
काही दिवसांकरिता बंद करण्यात आले आहे. यामुळे महाबळेश्वरातील शेकडो ‘टॅक्सींची चाके’ थांबली आहेत.
सलग आठ दिवसांपासून महाबळेश्वरात विक्रमी पावसाची नोंद होत आहे. पावसामुळे वेण्णा, कोयना व सावित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. महाड-पोलादपूर मार्गावर ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने संपूर्ण राज्याला या घटनेचा मोठा हादरा बसला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पालिका, पोलिस प्रशासन व वनविभागाच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
पावसामुळे निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती व त्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी महाबळेश्वर येथील तब्बल सहा मुख्य पॉइंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत हे पॉइंट बंद ठेवण्यात येणार आहे. या पॉइंटच्या प्रवेशद्वाराजवळ वनविभागाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले असून तारेचे कंपाऊंड करण्यात आले आहे.
महाबळेश्वरात टॅक्सी व्यावसायिकांची संख्या ३०० च्या घरात आले. बारमाही हंगाम असल्याने टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय नेहमीच सुरू असतो. शेकडो पर्यटक टॅक्सीतूनच महाबळेश्वरचा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात; मात्र प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘पॉइंट बंद’च्या निर्णयाने येथील शेकडो टॅक्सी गाड्यांची चाके थांबली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटनावर प्रभाव पडला आहे. (प्रतिनिधी)
पर्यटकांचा होतोय हिरमोड !
वीकेंडमुळे महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. तसेच अधूनमधूनही रेलचेल सुरूच आहे. पर्यटक या ठिकाणी पर्यटणाचा व पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत आहेत मात्र, येथील पाच प्वॉइंट बंद असल्याने पर्यटकांची हिरमोड होत आहे.प्वाइंटच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेला सूचना फलक पाहिल्यानंतर पर्यटक परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळे केवळ केट्स प्वॉइंट, गणपती मंदिर याठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी बाजारपेठ पर्यटकांनी गजबजून जात आहे.
मुसळधार पाऊस, दाट धुके यामुळे वाहन चालविताना अडचण येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महाबळेश्वर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे.
- रवींद्र हिरवे, अध्यक्ष,
टॅक्सी युनियन
महाबळेश्वरला जोडणाऱ्या अंबेनळी, पसरणी व केळघर या तिन्ही घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना अधून-मधून घडत आहे. पावसाचे सर्वाधिक प्रमाण व नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा, यासाठी प्रशासनाने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.
- रमेश शेडगे, तहसीलदार,महाबळेश्वर
बंद झालेले पॉइंट आर्थरसीट एल्फिस्टन सावित्री लिंगमळा धबधबा लॉडविक वेण्णा लेक नौकाविहार