औंध : खटाव तालुक्यात खरीप हंगामात विक्रमी बटाटा उत्पादन करणारा परिसर म्हणून ख्याती आहे. मात्र, खरिपाच्या हंगामाबरोबर रब्बीतही शेकडो हेक्टर बटाटा लागवड झाल्याने प्रत्येक हंगामात बटाटा पीक कोणत्याही बाजारपेठेत खटाव तालुक्यातील उपलब्ध होईल, अशा प्रगतशील शेतीकडे शेतकरी वळले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
यंदा बाजारपेठेत बटाट्याचे दर टिकून राहिल्याने रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांचा बटाटा लागवडीकडे कल आहे. अंदाजे साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर खटाव तालुक्यात शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या बाजारात बटाट्याचे दर अंदाजे ३० रुपये किलोप्रमाणे टिकून राहिले आहेत. दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात बटाटा लागवडीचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामात कूपर पुकराज आणि ज्योती अशा दोनच जातींच्या बियाण्यांची लागवड शेतकरी करतात. यंदा बाजारपेठेत पुकराच्या बियाण्याला जास्त मागणी होती. तालुक्यातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून अंदाजे ५०० ते ६०० टन बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. रब्बी हंगामात कुपरी पुकराज जातीच्या बियाणाला मोठ्या प्रमाणात उतारा मिळत असतो. त्यामुळे शेतकरी पुकराज लागवडीला प्राधान्य देतात. पावसाळ्याच्या तुलनेत रोगराई देखील हिवाळ्यात कमी राहते आणि उत्पादन चांगले निघते. तालुक्यातील औंध, पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड केली आहे. त्यामुळे केवळ खरिपासाठी बटाटा लागवडीला प्रसिद्ध असणारा तालुका आता रब्बीतही बटाटा उत्पादनात आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया:
रब्बी हंगामात बटाट्याला उतारा चांगला मिळतो. निगा राखली तर एका क्विंटलला वीस क्विंटलचा उतारा मिळतो. शिवाय रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. बाजारात दर चांगला असल्याने चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील. बियाण्याचे दर जास्त असले तरी उत्पादनामुळे आर्थिक ताळमेळ बसेल, या अपेक्षेने कुपरी पुकराजची लागवड केली आहे.
- अनिल माने, बटाटा उत्पादक, शेतकरी औंध
०२औंध
फोटो: औंध परिसरातील रब्बी हंगामातील जोमात असलेले बटाटा पीक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (छाया : रशिद शेख)