ओसाड माळरानावर गुलछडी फुलली

By Admin | Updated: October 6, 2015 00:43 IST2015-10-05T21:49:10+5:302015-10-06T00:43:42+5:30

फलटण तालुका : चार शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

Hump ​​falls on the ocean floor | ओसाड माळरानावर गुलछडी फुलली

ओसाड माळरानावर गुलछडी फुलली

आदर्की फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी आल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे मोठे शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी ऊस, कांदा या पिकांकडे वळला आहे. सासवड येथील रमणलाल अनपट या तरुण शेतकऱ्याने चार शेतकऱ्यांना एकत्र करून ६० गुंठ्यात गुलछडीचे पीक घेऊन बाजारपेठही मिळवून दिली आहे.सासवड, ता. फलटण हे फलटण पश्चिम भागातील महत्त्वाचे गाव. अगदी देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, फलटण संस्थानचे अधिपती मालोजीराजे निंबाळकर यांनी भेट दिलेले गाव; पण सासवड गावास पाणी मिळणे म्हणजे दिव्य स्वप्नच होते. त्यामुळे पाण्यासाठी सासवड गाव ११ वाड्या-वस्त्यांवर विखुरले गेले.परंतु गत दोन वर्षांपासून धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्यामार्फत सासवडपर्यंत पाणी पोहोचले आहे.दुष्काळी भागात पाणी आल्याने अनेक शेतकरी ऊस, कांदा, मका पिकांकडे वळले; परंतु मंजुरीमुळे व शेतीमालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी तोट्यात जाऊ लागला; परंतु सासवड येथील गोकूळनगर येथील रमणलाल विनायक अनपट याने पदवी घेऊन सुनील धुमाळ, सुधाकर अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सासवड ते सातारा ६० किलोमीटर दुचाकीवर प्रवास करताना सातारा मार्केटमध्ये येणारी गुलछडीचा विचार करून स्वत: रमणलाल अनपट व सुभाष अनपट, ज्ञानेश्वर अनपट, जिजाबा अनपट यांनी एकत्र येऊन पिंपळगाव, ता. दौंड येथून गुलछडीचे कंद आणून प्रत्येकी १५ गुंठ्यांप्रमाणे ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. रमणलाल अनपट यांनी विहिरीतील पाण्यात क्षार जास्त असल्याने जर्मन तंत्रज्ञान असलेली व ६३ हजार खर्चून क्षार विघटन करणारी मशीन बसवली आहे. त्यांनी ठिबक व बेडवर गुलछडी लागवड केली आहे. गुलछडीचे दर बाजारात कमी जास्त होत असतात. त्यामुळे त्यांनी वर्षभर गुलछडीचा दर व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो ८० रुपये ठरवून घेतल्याने शेतकरी वर्गास फायदा होत आहे.

रासायनिकला सेंद्रियचा उतारा
आम्ही रासायनिक शेताला फाटा देत सेंद्रिय शेती व झिरो बजेट शेती करण्यास प्रारंभ केला आहे. देशी गोमूत्र व शेण शेतीसाठी वापरल्याने माल बाजारात उठावदार दिसत आहे. पारंपरिक शेती करताना नोकरी, व्यवसाय, शेतीचा मेळ घालत गुलछडीची लागवड केली. यावर्षी गणपती व गौराई सणावेळी ५०० रुपये किलो गुलछडीचा दर झाला होता; परंतु आम्ही हमी भाव घेतल्याने प्रामाणिक राहून त्याच भावात दिल्याने व्यापारी वर्गालाही दर वाढवून दिला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समूह शेती व बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती केल्यास फायदेशीरच ठरते.
- रमणलाल अनपट, सासवड
सासवड (गोकुळनगर) येथील गुलछडी शेती व शेतकरी

जिद्दीने काळ्या आईची सेवा केली तर ती लेकरांना भरभरून देते असे म्हणतात. सासवड (गोकुळनगर) येथील गुलछडीची शेती करणाऱ्या रमणलाल अनपट यांच्या बाबतीत हे खरेही ठरले. अनपट यांच्या कष्टाचे सोने झाले आहे. शेतात जोमाने वाढणारे त्यांचे कष्ट बघण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शिवाराला भेट देवून त्यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक करतात.

सूर्यकांत निंबाळकर

Web Title: Hump ​​falls on the ocean floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.