नियतीच्या न्यायमंदिरात माणुसकी हरली!
By Admin | Updated: November 5, 2014 23:35 IST2014-11-05T21:54:52+5:302014-11-05T23:35:03+5:30
जिल्हा न्यायालयात वकिलाचा मृत्यू : रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेत बसायला कोणीच नव्हते तयार

नियतीच्या न्यायमंदिरात माणुसकी हरली!
सातारा : जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामासाठी आलेल्या एका तरुण वकिलाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अॅड. गणेश लेंडकर असे त्यांचे नाव आहे. पायऱ्या चढत असताना अचानक हृदयविकाराचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले. न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका डॉक्टरनी त्यांच्यावर प्रथमोचार करून रुग्णवाहिका बोलाविली; पण लेंडकर यांच्यासोबत रुग्णवाहिकेत बसायला कोणीही पुढे आले नाही. सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतानाच तेथे असलेल्या वंदना राऊत यांच्यातील परिचारिका जागी झाली अन् कसलाही विचार न करता त्यांनी लेंडकर यांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली. गर्दीतला एकाही माणसाने लेंडकर यांच्याबरोबर गाडीत बसणे टाळले अन् नियतीच्या न्यायमंदिरात माणुसकी हरली.
एका खटल्याच्या सुनावणीसाठी अहमदनगर येथून अॅड. गणेश नारायण लेंडकर (वय २९) हे सातारा जिल्हा न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील न्यायमूर्ती गावडे यांच्या कोर्टापुढे सुनावणी होणार होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अॅड. लेंडकर हे पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. मात्र, पायरीवरच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा धक्का एवढा तीव्र होता की ते जागेवरच कोसळले. क्षणार्धात लोकांनी गर्दी केली. काही जणांनी लेंडकर यांना उचलून बाकड्यावर बसविले. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. मात्र, कपाळाला लाल टिळा लावला असेल, असा लोकांचा समज झाला. योगायोगाने न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका डॉक्टरनी लेंडकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि वेळेचे गांभीर्य ओळखून तत्काळ रुग्णवाहिका बोलाविली.
रुग्णवाहिका तातडीने जिल्हा न्यायालयाच्या आवारात दाखल झाली. सगळीकडे एकच खळबळ उडाली. लोकांनी गर्दी केली. काही जणांनी अॅड. लेंडकर यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. मात्र, लेंडकर यांच्यासोबत रुग्णालयात जायला कोणीही तयार झाले नाही. रुग्णवाहिका काही वेळ तशीच उभी होती. गाडीचा वाहक कोणी बसतेय का, याची वाट पाहत होता. मात्र, गर्दीतले लोक फक्त एकमेकांकडे बघत होते. शेजारीच उभे असलेले एक पोलीस कर्मचारीही दूरूनच हा प्रकार पाहत होते.
योगायोगानेच वाई तालुक्यातील बावधन येथील पेशाने परिचारिका असणाऱ्या वंदना विष्णू राऊत या आपल्या कामासाठी जिल्हा न्यायालयात आल्या होत्या. त्यांनी हा प्रकार पाहिला. अॅड. लेंडकर यांच्यासोबत रुग्णालयात कोणीही जात नाही हे पाहून त्यांच्यातील परिचारिका जागी झाली अन् कसलाही विचार न करता काम बाजूला ठेवून त्या कर्तव्यभावनेने लेंडकर यांच्यासोबत रुग्णवाहिकेत बसल्या. शेजारीच उभ्या असलेल्या पोलीसदादाला त्या म्हणाल्या, ‘दादा, तुम्ही तरी चला ना बरोबर.’ पोलीसदादा गाडीत बसले अन् थेट रुग्णालय गाठले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच अॅड. गणेश लेंडकर यांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)
वकिलांना काही लोकांनी रुग्णवाहिकेत ठवले. मात्र, त्यांच्यासोबत कुणीही गाडीत बसायला तयार नव्हते. माणुसकीच्या नात्यानं अन् वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी मदतीसाठी पुढे यायला हवं होतं. वेळ प्रत्येकावर येते, याची जाणीव हवी.
- वंदना राऊत,
परिचारिका, बावधन
योगायोगाची गोष्ट...
ज्यावेळी अॅड. गणेश लेंडकर यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या कामानिमित्त एक डॉक्टर आणि एक परिचारिका जिल्हा न्यायालयात आले होते. डॉक्टरांनी लेंडकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले तर परिचारिका वंदना राऊत या लेंडकर यांना घेऊन रुग्णालयात धावल्या. मात्र, दुर्दैवाने दोघांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.
रुग्णालय परिसरात गर्दी
अॅड. गणेश लेंडकर यांचा सातारा जिल्ह्यातही मोठा मित्रपरिवार आहे. लेंडकर यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची बातमी समजातच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. एक तरुण आणि उमदा वकील निघून गेल्याने मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत होता.