राजाळेत हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:05+5:302021-05-11T04:41:05+5:30
फलटण : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत असून, त्याच ...

राजाळेत हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा
फलटण : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने बरड कृषी मंडलमधील राजाळे येथे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी या अभियानाची माहिती दिली.
विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण मोहीम फलटण तालुक्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे मंडल कृषी अधिकारी भरत रणवरे यांनी सांगितले.
कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी हुमणी किडीचा जीवनक्रम, त्याचे एकात्मिक पद्धतीने आणि जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रणाबाबत तसेच लष्करी अळी नियंत्रणाबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
हुमणीचे भुंगे नष्ट करण्यासाठी शेतातील बांधावर असलेल्या झाडाच्या खाली विजेचे प्रखर दिवे लावून प्रकाश सापळे तयार करावे, त्याखाली पाण्याने भरलेल्या टाकीत विजेच्या प्रखर प्रकाशामुळे भुंगे पडल्याने नष्ट होतात. त्याचप्रमाणे हुमणीचे भुंगे पकडण्यासाठी एरंडीमिश्रित सापळा तयार करुन तो शेतात ठेवण्याच्या पद्धतीबाबत तसेच रात्रीच्या वेळी कडुलिंब व बाभूळ झाडावर हुमणीचे भुंगेरे आल्यानंतर त्यावर कीटकनाशक फवारणीद्वारे नियंत्रण पद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
राजाळे येथील जयंतराव निंबाळकर, विजय अनपट यांच्या शेतावर प्रकाश सापळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.