सातारा : शहरालगत असणाऱ्या कोडोली परिसरातील चंदननगर येथील जानाई मळाईच्या पायथ्याला मानवी कवटी आढळून आली. भटक्या कुत्र्याने ही कवटी तोंडातून ओढून आणत एका घरासमोरच टाकल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोणाचा घातपात झाला आहे की काय, अशी शंका वर्तवण्यात येत असून, सातारा शहर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी ही कवटी ताब्यात घेतली असून, पुण्यातील प्रयोगशाळेत ही कवटी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली परिसरातील जनाई मळाई परिसरातील भटक्या कुत्र्याने बुधवारी दुपारी एक मानवी कवटी ओढत आणली. एका घराच्या समोरच ही कवटी टाकली. स्थानिक नागरिकांनी हे पाहिल्यानंतर तेथे गर्दी जमली. याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनीही भेट दिली आणि उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करत पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.
स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.