एवढी घाण पाच वर्षांत कशी साफ होणार?
By Admin | Updated: June 11, 2015 00:25 IST2015-06-10T23:32:32+5:302015-06-11T00:25:14+5:30
अविनाश मोहिते : ‘कृष्णे’च्या ताकारी-बळे येथील प्रचारसभेत विरोधकांचा घेतला समाचार

एवढी घाण पाच वर्षांत कशी साफ होणार?
कऱ्हाड : ‘संस्थापक पॅनेलची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली. सभासद कोणत्या गटाचा किंवा पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही. शेतकरी सभासद हाच कारखान्याचा मालक असल्याची भावना जपली; परंतु मोहिते-भोसले हे माझ्यावर व कारखान्यावर टीका करीत आहेत. कारखान्याच्या स्थापनेपासून सत्ता यांच्याच घरात आलटून पालटून जास्तवेळ होती. मग या ५० वर्षांची घाण पाच वर्षांत मी कशी साफ करणार,’ असा टोला यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी लगावला.
ताकारी-बहे, ता. वाळवा येथे संस्थापक पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कामगार पक्षाचे नेते अॅड. रवींद्र पवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले, ‘विरोधकांच्या ताब्यात कारखाना होता, त्यावेळी त्यांचा कारभार कसा होता, हे आपण जाणता. कारखाना जेव्हा २०१० मध्ये संस्थापक पॅनेलच्या ताब्यात आला, तेव्हा तो कर्ज मुक्त होता का? त्यांनी केलेल्या कर्जाची परतफेड आम्ही केली. १०० रुपये बिल बुडविणारे, १० रुपये फायनल बिल काढणारे, १ रुपये दुखवट्याचे बिल देणाऱ्यांना आपण पुन्हा सत्ता द्यायची का? यांच्या घरगुती भांडणात सभासद भरडला गेला.
घराघरात भांडणे लागली. ही मंडळी स्वार्थासाठी कधी एक होणार, कधी बाजूला जाणार, हा त्यांचा घरगुती विषय आहे. नेहमी हे म्हणतील तेव्हा सभासदांनी यांच्या पाठीमागून जायचे का? ही निवडणूक सभासदांच्या मानसन्मानाची आहे.’ असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)