कऱ्हाडात वृक्ष किती, पालिका मोजणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:41+5:302021-09-07T04:46:41+5:30
कऱ्हाड : राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सहभागी पालिकांना वृक्षगणना बंधनकारक केली आहे. मात्र, कऱ्हाडात गत दहा वर्षांपासून एकदाही ...

कऱ्हाडात वृक्ष किती, पालिका मोजणार कधी?
कऱ्हाड : राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सहभागी पालिकांना वृक्षगणना बंधनकारक केली आहे. मात्र, कऱ्हाडात गत दहा वर्षांपासून एकदाही झाडांची मोजदाद झालेली नाही. यापूर्वी २०११ मध्ये ‘एन्व्हायरो’ या सामाजिक संस्थेने ही गणना केली होती. मात्र, त्यानंतर अद्यापही पालिकेने यासाठी पाऊले उचललेली नाहीत.
शहरातील वृक्षांची गणना करण्यासाठी २०११-१२ मध्ये ‘एन्व्हायरो’ या संस्थेने मोहीम आखली होती. त्यावेळी संस्थेने खासगी आणि सार्वजनिक ठिकाणच्या सर्व वृक्षांची मोजदाद केली. पालिकेनेही त्यावेळी गणनेचे काम हाती घेतले होते. मात्र, ते सदोष असल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे ‘एन्व्हायरो’ने केलेल्या सर्व्हेनुसारच आत्तापर्यंत वृक्षांची संख्या गृहित धरली जात आहे. त्यानंतर गत दहा वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे वृक्षांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. मात्र, शहरात नक्की किती व कोणत्या जातीचे वृक्ष आहेत, याबाबतची ठोस माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. कऱ्हाडसारख्या शहरात दर पाच वर्षांनी वृक्षगणना अपेक्षित आहे. मात्र, पालिका त्याबाबत उदासीन असल्याचे दिसते.
- चौकट
दहा वर्षांपूर्वी २१ हजार २७६ वृक्ष
कऱ्हाडात ‘एन्व्हायरो’ संस्थेच्यावतीने २०११-१२ मध्ये वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये खासगी आणि सार्वजनिक असे २१ हजार २७६ वृक्ष नोंदले गेले होते. आता ही संख्या अने् पटींनी वाढली असणार आहे.
- चौकट (फोटो : ०६केआरडी०२)
वृक्षसंपदेची २०११ ची स्थिती
३,७६५ : उंच वाढणारी झाडे
३,१४७ : उंच डेरेदार झाडे
३,७२० : मध्यम उंच व डेरेदार वृक्ष
१,१२८ : शोभेची कमी उंचीची झाडे
२१६ : औषधी वनस्पतींची झाडे
९,३०० : इतर सर्व प्रकारचे वृक्ष
२१,२७६ : शहरातील एकूण वृक्षसंख्या
- चौकट
‘एन्व्हायरो’ने केलेल्या नोंदी
२१०७ : नारळ
१२९२ : आंबा
७१६ : रामफळ
९२ : फणस
२५२ : जांभूळ
४३३ : सुरू
२४४ : निलगिरी
२१८ : सुबाभूळ
२८५ : साग
७७९ : कडुलिंब
१२१ : सिंगापूर चेरी
१४३ : चंदन
१३०३ : अशोका
१३२९१ : इतर
- चौकट
२१,२७६ वृक्षांपैकी...
फळझाडे : २३ टक्के
फुलझाडे : २८ टक्के
शोभेची झाडे : १९ टक्के
औषधी : ९ टक्के
इतर : २१ टक्के
- कोट
‘माझी वसुंधरा’अभियानासाठी कऱ्हाड पालिका जय्यत तयारी करीत आहे. शहरातील वृक्षगणना लवकरच केली जाणार असून, नव्याने वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. वृक्षसंवर्धन हे पालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच पालिका स्वत:ची नर्सरी उभारणार आहे.
- रमाकांत डाके,
मुख्याधिकारी, कऱ्हाड
- कोट
कऱ्हाड पालिकेने अनेक वर्षांपासून अशी वृक्षगणना केलेली नाही. मुळातच पन्नास वर्षांपूर्वीच्या झाडांना राज्य शासनाने ‘हेरिटेज’चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानात सहभागी होणाऱ्या पालिकांनाही कार्यक्षेत्रातील वृक्षगणना बंधनकारकही केली आहे.
- जालिंदर काशिद
अध्यक्ष, ‘एन्व्हायरो’ क्लब
फोटो : ०६केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडातील मुख्य रस्ता गर्द झाडीने असा व्यापलेला दिसून येतो. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा आहे. मात्र, दहा वर्षांपासून त्याची मोजदाद झालेली नाही.