विद्यार्थ्यांनी उन्हात किती दिवस बसायचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:54+5:302021-03-09T04:41:54+5:30
औंध : फलटण-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अगदी कासवाच्या गतीने सुरू आहे. औंध बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या ...

विद्यार्थ्यांनी उन्हात किती दिवस बसायचे!
औंध : फलटण-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अगदी कासवाच्या गतीने सुरू आहे. औंध बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एसटी बसस्थानकात जात नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना औंधच्या चौकात बसची वाट बघत तीव्र उन्हात ताटकळत बसावे लागत आहे. शाळा सुरू असूनही रखडलेले काम पूर्ण करायचे नाव घेत नसल्याने ठेकेदाराला जाब विचारणारे कोण आहे का नाही? असा सवाल प्रवासी, ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना पडला आहे.
औंधमध्ये खबालवाडी रस्ता ते केदार चौक रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. छोटे सीडीवर्क आणि केदारेश्वर मंदिरानजीकच्या पुलाचे काम बरेच दिवस सुरू आहे. केदारेश्वर पुलाजवळ काढलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे अवजड वाहने आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची येथे मोठी कसरत होते. बऱ्याचदा ट्रॅक्टर पलटी देखील झाले आहेत. तसेच नवीन बसस्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी उखडला आहे. रस्ता उखडल्याने बसस्थानकात एसटी जात नाही. त्यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना चौकात गाडीसाठी थांबावे लागते. बस वेळेवर येत नाही आणि कुठेही सावली नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात बसची वाट पाहत बसावे लागते. तसेच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने धुळीचे लोट उडत आहेत. धुळीच्या त्रासाने दुकानदार आणि रस्त्यानजीकचे घरातील लोक वैतागले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने हे काम नेमके कधी पूर्ण होणार, याचे कोडे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांना पडले आहे.
(चौकट)
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
काम संथगतीने सुरू आहे. एसटी बसस्थानकात जात नाही, धुळीने दुकानदार हैराण झाले आहेत. अर्धवट कामाबद्दल ग्रामस्थांनी जाब कोणाला विचारला, तर ठेकेदार सापडत नाही, त्यामुळे अधिकारी तर कानाडोळा करीत नाहीत ना, याचे कोडे ग्रामस्थांना पडले आहे.
०८औंध
फोटो:
औंध बसस्थानकाजवळील रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले आहे. काम पूर्ण कधी होणार याची प्रतीक्षा ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यावसायिक यांना आहे.
(छाया : रशिद शेख)