शिक्षणाला भरला पैसा, नोकरीसाठी आणावा कसा?

By Admin | Updated: December 11, 2014 23:49 IST2014-12-11T21:44:57+5:302014-12-11T23:49:50+5:30

नवशिक्षकांची दशा : नोकरी मिळेना म्हणून शिकवण्या घेण्याची वेळ--हतबल गुरुजींचानिबंध - तीन

How to get education full of money, hiring? | शिक्षणाला भरला पैसा, नोकरीसाठी आणावा कसा?

शिक्षणाला भरला पैसा, नोकरीसाठी आणावा कसा?

प्रदीप यादव -सातारा  --शिक्षकाची नोकरी म्हणजे समाजात मान, प्रतिष्ठा. आई-वडिलांनी मोलमजुरी करून, पोटाला चिमटा काढून जमविलेली पै-पै शिक्षक बनविण्यासाठी खर्ची घातली. चांगल्या मार्कांनी शिक्षणशास्त्राची पदवी मिळविली; पण चांगल्या गुणांचे वजन चालत नाही काही संस्थांना. अनुदान नसल्याने फक्त ‘अर्थ’पूर्ण व्यवहारच कळतो. शिक्षणासाठी पैसे भरले, आता पुन्हा नोकरीसाठी आणायचे कुठून? नोकरीची वाट तरी किती बघायची? पोट भरण्यासाठी शिकवण्या घेण्यावाचून दुसरे करू तरी काय शकतो, ही स्थिती आहे नवशिक्षकांची.
शिक्षक बनविण्याऱ्या कारखान्यांतून दरवर्षी नवशिक्षकांचे लोंढे बाहेर पडत आहेत. त्यांना नोकरी देणे, हे शासनाचे काम आहे. पण एवढ्या उमेदवारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेणे अशक्य असल्याने उमेदवारांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. वाट पाहून अनेकांचे नोकरीचे वय निघून गेले तर अनेकांनी नोकरीची अपेक्षा सोडून दुसऱ्याच्या बांधावर मजुरी करण्याचे काम पत्करल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत.
आई-वडिलांनी काबाडकष्ट करून शिक्षक बनविले खरे; पण नोकरीच मिळत नसल्यामुळे अनेकांनी स्वत:च्या खासगी शिकवण्या सुरू केल्या आहेत. तर काही जण शहरातल्या क्लासेसमध्ये दोन-चार हजारांवर नोकरी करत आहेत. शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी वर्षानुवर्षे त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे या जागा कधी भरणार याकडे अनेकांचे लक्ष असते.
त्या-त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही म्हणून जागा रिक्त असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक शिक्षण संस्थांमध्ये अनुशेष भरला नसल्यामुळे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना जादा काम करावे लागते तर दुसरीकडे दरवर्षी शिक्षणशास्त्राच्या पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांना नोकरी मिळत नाही, असा विरोधाभासही पाहावयास मिळतो. ‘अर्थ’कारण हेच यामागचे कारण असल्याने नवशिक्षकांवर शिकवण्या घेण्याची वेळ आली आहे.

खासगी शिकवण्यांचे पेव
शहरी आणि ग्रामीण भागातही खासगी शिकवण्यांचे पेव वाढले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. साहजिकच शिकवणीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करताना दिसतात.


ज्याच्याकडे पैसा त्यालाच नोकरी
शिक्षक बनण्यासाठीही आता ऐपत असावी लागते. पैसे भरण्याची ऐपत असेल त्यालाच आता नोकरी मिळते, ही वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षक होण्याचे दिवस आता संपले. कारण लोखो रुपये डोनेशन म्हणून दिल्यानंतरच एखाद्या शिक्षण संस्थेत नोकरीला चिकटवता येतं, असा विचार आता रुढ होत आहे.

Web Title: How to get education full of money, hiring?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.