घरपट्टी थकीत; विंगचा ग्रामपंचायत सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:43 IST2017-10-22T23:43:20+5:302017-10-22T23:43:20+5:30

घरपट्टी थकीत; विंगचा ग्रामपंचायत सदस्य अपात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विंग ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट दिनकर भिसे यांना घरपट्टी थकीतप्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अपात्र ठरविले आहे,’ अशी माहिती तक्रारदार महादेव किसन कदम यांनी दिली.
विंग (ता. खंडाळा) येथील ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाते. यामध्ये विंग येथील पोपट दिनकर भिसे हे २०१५-१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आले होते. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यापासून पोपट भिसे यांनी स्वत:ची घरपट्टी ग्रामपंचायत दप्तरी भरली नसल्याची तक्रार करत त्यांना ग्रामपंचायत सदस्यत्वापासून अपात्र करण्याची मागणी विंग येथील महादेव किसन कदम यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली होती.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शासन निर्णयानंतर ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार महादेव कदम यांनी केलेली तक्रार ग्राह्य मानत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विंग ग्रामपंचायत सदस्य पोपट भिसे यांना ग्रामपंचायत सदस्यत्वापासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) मधील खंड (ज-१)अन्वये अपात्र करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे विंग परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.