मलकापुरात घंटानाद
By Admin | Updated: December 23, 2014 00:30 IST2014-12-23T00:30:05+5:302014-12-23T00:30:05+5:30
करवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन : आश्वासनानंतर नगरपंचायतीसमोरील आंदोलन स्थगित

मलकापुरात घंटानाद
मलकापूर : मूल्यवर्धित कर आकारणीसाठी बजावण्यात आलेल्या नोटिसांमधील प्रस्तावित कर अवास्तव, सदोष व अन्यायकारक आहे़ या अन्यायाविरोधात शिवसेनेच्या वतीने नगरपंचायतीसमोर सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले़ मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मलकापुरात सध्या करवाढ हा कळीचा मुद्दा बनला आहे़ या अवास्तव करवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घंटानाद आंदोलन करण्यात आले़ मुख्याधिकारी राजेंद्र तेली व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून करवाढीविरोधात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात शिवसेनेचे नितीन काशीद, रामभाऊ रैनाक, दिलीप यादव, शशीराज करपे, नरेंद्र लोहार, संतोष सुपनेकर, अनिल चव्हाण, सूर्यकांत मानकर, मधुकर शेलार, प्रमोद तोडकर, विनायक भोसले, आनंदराव डांगे, विशाल गंदे, सुनील पवार, अशोक कार्वे यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (वार्ताहर)