अहवालाच्या पुढं घोडं सरकेना!
By Admin | Updated: December 25, 2014 00:14 IST2014-12-24T21:57:52+5:302014-12-25T00:14:21+5:30
अवकाळी नुकसान : निसर्गाचा कोप सुरुच

अहवालाच्या पुढं घोडं सरकेना!
सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कऱ्हाड, जावळी, फलटण, खंडाळा या तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी प्राथमिक अहवालाच्या पुढं पंचनाम्याचं घोडं सरकेना, अशी स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासन दरबारी सादर झाला असला तरी अद्याप त्याचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.
नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. एकट्या फलटण तालुक्यात ३८.३७ हेक्टर क्षेत्रातील ऐंशी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले व जावळी तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांचे ६.९0 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद सध्या शासन दरबारी झाली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यातही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यापैकी ११ ते १५ डिसेंबर या कालावधीतील नुकसानीच्या पंचनाम्यांची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे तयार आहे. जिल्ह्यातील एकूण ३४ गावांतील १ हजार १३१ शेतकऱ्यांचे ४३५.६९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये खंडाळा, फलटण, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश आहे.
पिकांच्या नुकसानीसाठी १०.४६ लाखांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. सातारा जिल्ह्यातील १६ गावांमधील १३३ शेतकऱ्यांना शासनाकडून उपलब्ध झाल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. मात्र, अनुदानाबाबत शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)