घोडे मार्केटमध्ये; पोनी स्टँड रिकामा!
By Admin | Updated: January 2, 2015 23:58 IST2015-01-02T22:46:09+5:302015-01-02T23:58:23+5:30
गर्दीत लागतो धक्का : धूळ, दुर्गंधीमुळेही उद््भवतात वादाचे प्रसंग--घोड्याला टाच पाहुण्यांना जाच

घोडे मार्केटमध्ये; पोनी स्टँड रिकामा!
सातारा : महाबळेश्वरच्या घोडेवाल्यांशी पर्यटक आणि इतरांची बाचाबाची होण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यास अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवरून घोड्यांची होणारी ये-जा याच मुद्द्याजवळ कोणीही जाऊन पोहोचतो. पालिकेनं दिलेल्या ‘पोनी स्टँड’वर घोडे उभेच नसतात, तर ‘सवारी’ शोधत ते भरबाजारातून फिरतात आणि कलह उद््भवतो.
संघर्षाची तीन प्रमुख कारणे असल्याचा निष्कर्ष काढता येतो. घोड्याचा धक्का लागणं, धूळ आणि दुर्गंधी. सर्वाधिक घोडे वेण्णा लेकवर उभे असतात. सायंकाळच्या वेळी वेण्णा धरणाच्या वरील मैदानावर घोडे पळविले जातात. त्यामुळं उडणाऱ्या धुळीमुळं तिथल्या झाडांवरही धूळ बसलेली स्पष्ट दिसते. हिरवी झाडं लाल झाली आहेत. शेजारीच पालिकेचा टोलनाका आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी नाक्याच्या भोवती हिरवं कार्पेट टाकून धुळीपासून संरक्षण मिळवलंय. वेण्णा लेकचं पाणी शहराला पिण्यासाठी पुरवलं जातं. शेजारीच उडणारी धूळ आणि घोड्याची लीद थेट पाण्यात मिसळते. पाणी शुद्धीकरणानंतर शहराला पुरवण्यात येत असलं, तरी मुळात ते खराबच होऊ नये, याची काळजी घेतली जात नाही. (प्रतिनिधी)
घोडे बांधण्यास जागेची मागणी
मुंबई पॉइंटवर घोडा आतपर्यंत नेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी घोडेवाल्यांनी मोर्चा काढला होता. तेथे दोन पायांवर घोड्याला उभे करून फोटो काढणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु हा भाग वन विभागाच्या ताब्यात असल्यामुळे घोडेवाल्यांच्या मागणीविषयी चर्चेचे आश्वासनच पालिका देऊ शकली. या मागणीचे पुढे काहीच झाले नाही. ‘पोनी स्टँड’ म्हणून दिलेली जागा फारच अपुरी असून, तिथे दीडशे घोडे मावू शकत नाहीत. माथेरानप्रमाणं मोठी जागा देऊन शेड उभारावी, अशी घोडेवाल्यांची मागणी आहे.
काही ठळक नोंदी
महाबळेश्वरात सुमारे दीडशे घोडे आहेत.
घोड्यांच्या किमती दोन ते चार लाखांच्या दरम्यान आहेत.
सामान्यत: सायंकाळच्या वेळी घोडसवारीचा व्यवसाय होतो.
भल्या सकाळी घोडा भाड्याने घेऊन काहीजण चायनामेन वॉटरफॉलपर्यंत रपेट करतात.
पालिकेचे काही सफाई कामगार दिवसभर कचरा उचलून सायंकाळी घोड्याचा व्यवसाय करतात.
घोड्यासाठी पालिकेचा वार्षिक कर फक्त दोनशे रुपये आहे. तुलनेने घोड्यांमुळे होणारी घाण साफ करण्याचे काम खूपच मोठे आहे.
अनेक घोडेवाल्यांना घोडा ठेवण्यास जागा नाही. त्यांनी पालिका, वन विभाग किंवा खासगी जागेत शेड उभारले आहेत.
पावसाळ्यात घोडे महाबळेश्वरात न ठेवता वाई किंवा साताऱ्याला कोणाला तरी सांभाळायला दिले जातात.