सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:26+5:302021-08-26T04:42:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: आपल्या परिसरातील आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी अलीकडे गल्लीतील तरुण डॉनगिरीचा खटाटोप करत असल्याचे पाहायला मिळतेय. कोणी ...

Hooliganism on social media! | सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: आपल्या परिसरातील आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी अलीकडे गल्लीतील तरुण

डॉनगिरीचा खटाटोप करत असल्याचे पाहायला मिळतेय. कोणी तलवारीने केक कापतोय, तर कोणी कोयत्याने केक कापून आपला वाढदिवस साजरा करतोय. हे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून, आपण गल्लीतील कसे डॉन आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न तरुण वर्ग करू लागलाय. अशा तरुणावर पोलिसांनी नजर ठेवली असून, अडीच वर्षांत पोलिसांनी ५३ गुन्हे दाखल केले आहेत.

गल्लीतील कोणाचाही वाढदिवस असला की, तरुण सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर जमा होतात. मग रात्र असो की दिवस. रस्त्यावर बाइक उभी करून त्या बाइकवर केक ठेवला जातो. सेलिब्रेशनच्या नावाखाली आरडाओरड करून केक कापून घातक शस्त्रास्त्राचेही प्रदर्शन केले जाते. हे प्रदर्शन म्हणजे भविष्यातील डॉनगिरीचे संकेत मिळत असतात. अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला नाही, तर आई-वडिलांसह समाजाचीही डोकेदुखी ही मुले ठरत आहेत.

चौकट: तलवारीने केक कापण्याची फॅशन

वाढदिवसाला हल्ली तलवारीने केक कापण्याची फॅशन पाहायला मिळतेय, पण हा कायद्याने गुन्हा आहे. याची अनेकांना कल्पना नसते. उत्साहाच्या भरात सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापला जातो. एवढ्यावरच न थांबता वाढदिवसाचे तलवारीने केक कापलेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यावेळी मग पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. मग मुलांचे आई-वडील पोलीस ठाण्यात येऊन गयावया करतात. सातारा शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.

चौकट: कट्टा, तलवार अन् चाकू

१) समर्थ मंदिर येथील चौकामध्ये काही महिन्यांपूर्वी युवकांच्या गटाने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता.

२) विसावा नाक्यावरही युवकांच्या गटाने चाकूने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

३) बस स्थानक परिसरात चार युवकांनी तलवारीने केक कापून चारी तलवारी हातात घेऊन फोटो काढले होते.

४) शाहुपुरी परिसरातही तलवारीने केक कापून वीस-पंचवीस युवकांनी एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला होता. या मुलांवरही पोलिसांनी कारवाई केली.

चौकट : लाइक करणारेही येणार अडचणीत!

तलवारीने केक कापलेले फोटो सोशल मीडियावर अनेक जण व्हायरल करतात. अनेक जण फोटो पाहून लाइक करतात, पण आता हे लाइक करणारेही चांगलेच अडचणीत येणार आहेत. अशा फोटोंना जितक्या लोकांनी लाइक केले आहे, तितक्या लोकांवर पोलीस सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे वाढदिवसाचे असे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल करणाऱ्या युवकांनी खबरदारी घेतलीच पाहिजे, शिवाय लाइक करणाऱ्या इतर मित्र व नातेवाइकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस करत आहेत.

कोट : अनेक जण तलवारीने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. मुळात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करू नये. अशा घातक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे हा गुन्हा आहे.

सजन हंकारे, पोलीस निरीक्षक सातारा तालुका

चौकट : दाखल गुन्हे

२०१९- २६

२०२०-१९

ऑगस्ट, २०२१- ८

Web Title: Hooliganism on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.