बाधित रुग्णांकडून ‘होम क्वारंटाइन’ला पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:43+5:302021-04-05T04:34:43+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर, घराघरात अख्खं कुटुंब पाझिटिव्ह येऊ लागले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती ...

बाधित रुग्णांकडून ‘होम क्वारंटाइन’ला पसंती!
सातारा : जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर, घराघरात अख्खं कुटुंब पाझिटिव्ह येऊ लागले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती झाली असून, अनेक जण रुग्णालयात जाण्याऐवजी होम क्वारंटाइन होणे पसंत करत आहेत. मात्र, या रुग्णांवर कोणाचेही लक्ष नसून, ना रुग्णावर उपचार केले जात आहेत, ना प्रशासनाचा ताळमेळ बसत. अशी सारीच भयावह स्थिती आहे. अनेक बाधित रुग्णांकडून यंदा होम क्वारंटाइनला पसंती मिळत असल्याने, उपचाराचा हा वेगळा ट्रेंड सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. कोविड जम्बो रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खावलीमधील कोरोना सेंटर आता हाऊस फुल्ल होऊ लागली आहेत. गतवर्षीचा अनुभव अनेकांच्या पाठीशी असल्यामुळे या वर्षी अनेक जण होम क्वारंटाइन होणे पसंत करत आहेत. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा रुग्णांना हाॅस्पिटलची गरज भासत आहे, परंतु ज्यांना साैम्य लक्षणे आहेत, असे रुग्ण स्वत:हून होम क्वारंटाइन होत आहेत, परंतु प्रशासनाकडून या रुग्णांची कसलीही दखल घेतली जात नाही. केवळ पाॅझिटिव्ह मेसेज दिल्यानंतर प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही कोरोना बाधितांच्या नातेवाइकांमधून केला जात आहे. या रुग्णांना सौम्य लक्षणे असली, तरी त्यांना औषधोपचाराची खरी गरज आहे. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा हातात वेळ आहे. तोपर्यंत तरी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. होम क्वारंटाइन असलेल्या बाधित रुग्णांची मानसिक स्थिती बिघडली आहे. अनेक जण चिंतातुर झाले आहेत. एकीकडे रुग्णालयात बेड शिल्लक नसताना दुसरीकडे आपणहून लोक होम क्वारंटाइन होत असतील, तर त्यांच्या मदतीला प्रशासनाने धावले पाहिजे. गत वर्षीसारख्या यंदा प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
चाैकट : बांबू गेले...कंटेन्मेंट झोनही नाही!
शहरात गत वर्षी गल्लोगल्ली बांबूने रस्ते अडवले गेले होते, तर ज्या इमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळून येईल, तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात होता, परंतु यंदा याउलट परिस्थिती आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे. असे असतानाही प्रशासनाकडून गतवर्षीसारख्या कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. सर्व काही नागरिकांवरच सोपविले गेले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत आहेत.