निसर्गाच्या स्पर्शाने रंगले सलग सुटीचे दिवस..

By Admin | Updated: November 15, 2015 23:52 IST2015-11-15T22:12:18+5:302015-11-15T23:52:51+5:30

पर्यटकांची गर्दी : कास जलाशयाजवळ पिकनिक; वन्यजीवांच्या घरात आतषबाजीची हौस

Holidays celebrated with the touch of nature. | निसर्गाच्या स्पर्शाने रंगले सलग सुटीचे दिवस..

निसर्गाच्या स्पर्शाने रंगले सलग सुटीचे दिवस..

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या कास तलाव परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे. दिवाळी सुटीमुळे जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांनी कास तलावाला भेट देऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या कास पठार व तलावाला पर्यटक नेमहीच भेट देतात. फुलांच्या हंगाम सुरू होताच याठिकाणी राज्यासह देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावलत. सध्या दिवाली सुटीमुळे हा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू असून, पुणे, सोलापूर, कोल्हापूर तसेच इतर जिल्ह्यांतील पर्यटक कासला भेट देत आहेत. तरुणवर्ग संगीताच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त करीत आहेत. बालचिमुकल्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत तलावावर दिवाळी साजरी केली.
अनेक तरुणांनी तलावात जलविहाराचा आनंद लुटला. येथील नयनरम्य दृश्य स्मरणात राहावे, यासाठी पर्यटक आपापल्या कॅमेरात छायाचित्रे टिपताना दिसत होते. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्याने संपूर्ण कास तलाव परिसर रविवारी गजबजून गेला होता. (वार्ताहर)


पर्यटकांचे वनभोजन
कास तलावाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यान भोजनाचा आस्वाद घेतला. अनेक पर्यटकांनी जेवण बनविण्यासाठी चुली बनविल्या होत्या. प्रत्येकाची जेवण बनविण्याची लगबग दिसून येत होती.
फटाक्यांची आतषबाजी
रविवारी संपूर्ण कास तलाव परिसर ‘शांताबाई’च्या गाण्याने दुमदमला होता. तरुणाई या गाण्यावर मनसोक्त थिरकताना दिसली. यावेळी काही अतिउत्साही युवकांकडून फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली.

कास परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो. फटाक्यांच्या आवाजाने वन्यजीवांवर याचा परिणाम होतो. त्यामुळे कास तलाव परिसरात फटाके वाजविणे चुकीचे आहे. अशा अतिउत्साही युवकांना वेळीच रोखने गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
- विशाल बल्लाळ, पर्यटक

Web Title: Holidays celebrated with the touch of nature.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.