मारा दगड... मी हेल्मेट घातलंय !

By Admin | Updated: November 11, 2014 23:20 IST2014-11-11T23:13:16+5:302014-11-11T23:20:42+5:30

उदयनराजे आक्रमक : आत्मपरीक्षणाचा आमदारांना सल्ला

Hit the stone ... I'm hitting the helmet! | मारा दगड... मी हेल्मेट घातलंय !

मारा दगड... मी हेल्मेट घातलंय !

सातारा : ‘आमचा दगडाखाली हात अडकला आहे. त्यामुळे मी गाडीतूनच हेल्मेट घालून आलोय. हिंमत असेल तर दगड बाजूला करून दाखवा. दगड जागेवर ठेवायचा असेल तर सन्मानपूर्वक ठेवा,’ अशा शब्दांत मनोमिलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘माझ्याशी चुकीचे वागलात तरी चालेल. मात्र सर्व नगरसेवकांशी नीट वागा,’ असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना नाव न घेता दिला. ‘मला अजून मॅच्युरिटी आली नाही; पण मला लोकांचं हदय कळतं,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, ‘पोस्टमॉर्टेमची चर्चा केली जाते. माझ्या हिशेबाने आतापर्यंत मी खूप पोस्टमॉर्टेम पाहिली आहेत; पण माणूस मेल्यानंतर.. आपले मतदान कमी का झाले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. विधानसभा निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे मतदान नगरविकास आघाडीपेक्षा जास्त झाले आहे. ‘साविआ’ आणि त्यांची ‘नविआ’ या दोन्ही आघाड्यांनी प्रामाणिकपणे काम केले. सगळे नगरसेवक मला विचारतायत, आमची चूक काय झाली? त्यांनी परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मी नगरसेवक, आमदार, मंत्री-संत्री अगदी पहारेकरीही झालो. आहोरात्र काम करत आलो. मनोमिलनाच्या माध्यमातून मीपण बरीच विकासकामे केली. कास धरणाची उंची तसेच इतर सुविधाही माझ्यामुळे उपलब्ध झाल्या.’
‘मी कधी स्वत:ची टिमकी वाजवत नाही आणि टीमकी वाजवायला मी मोकळा नाही. आम्ही केलेले काम आणि त्यांनी केलेले काम बघा. त्यांनी शहापूर योजना आणली; मात्र कण्हेरची आणली असती तर बरं झालं असतं. पण मला श्रेयवादात पडायचं नाही आणि बोलायचंही नाही. लोकांसाठी काम करता आलं पाहिजे. त्यांच्याकडूनही बेताल वक्तव्ये अपेक्षित नाहीत,’ असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

काय बाय सांगू...
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या घटलेल्या मताधिक्यावर मतप्रदर्शन केले. ‘काय बाय सांगू... कसं गं सांगू...मलाच माझी वाटे लाज.. काही तरी होऊन गेलंय आज..’ हे गाणं गुणगुणतच उदयनराजेंनी बोलायला सुरूवात केली. ‘या गाण्यासारखीच माझी स्थिती झाली आहे,’ असे ते म्हणाले.

Web Title: Hit the stone ... I'm hitting the helmet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.