माती वाहतूक करणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:44+5:302021-01-08T06:04:44+5:30

पाटण : तालुक्यात बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दोन डंपर, ...

Hit the soil transporters | माती वाहतूक करणाऱ्यांना दणका

माती वाहतूक करणाऱ्यांना दणका

पाटण : तालुक्यात बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दोन डंपर, तीन ट्रक, एक ट्रॅक्टर अशा सहा वाहनांवर कारवाई करून ६६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

पाटण तालुक्यात कोयना नदीसह इतर उपनद्यांचे विस्तीर्ण पात्र आहे. या पात्रालगत मातीही मोठ्या प्रमाणावर असून, सध्या तस्करांनी या मातीवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. काहीजणांनी रीतसर रॉयल्टी भरून माती उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे, तर काहीजण बेकायदेशीरीत्या मातीचे उत्खनन व वाहतूक करीत आहेत. तसेच परवानाधारक आणि बिगरपरवानाधारक असे सर्वजण नियमबाह्यरीत्या ही वाहतूक करीत आहेत. माती वाहतूक करताना पाळावयाच्या नियमांना तिलांजली देऊन मनमानीपणे ही वाहतूक केली जात आहे.

गत काही दिवसांपासून तालुक्यात बेकायदेशीर माती वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात होती. याकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याने माती वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावले होते. दररोज शेकडो वाहने रस्त्यावरून ये-जा करत होती. अखेर दोन दिवसांपुर्वी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनीच पाटण तालुक्यातील अडूळ येथे ४ व नेरले येथे २ अशा ६ वाहनांवर बेकायदेशीर माती वाहतूकप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.

पावती नसणे, पावतीवर खाडाखोड करणे, पावतीवर तपशील नसणे, आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. त्यातून सहा वाहनधारकांकडून ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे बेकायदेशीररीत्या माती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Hit the soil transporters