मार खाऊनही ‘आळी मिळी गूप चिळी’!
By Admin | Updated: November 18, 2015 00:06 IST2015-11-17T22:19:12+5:302015-11-18T00:06:36+5:30
पालिकेत मारहाण ’नाट्य’ : दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याचा कर्मचाऱ्याचा इशारा; प्रशासनामध्ये खळबळ

मार खाऊनही ‘आळी मिळी गूप चिळी’!
सातारा : नगर विकास आघाडीतील दोन नगरसेवकांमध्ये सध्या सुरू असलेली धूसफूस एका बिगाऱ्यावर राग काढण्यापर्यंत गेली. गेल्या वर्षभरापासून संबंधीत कर्मचाऱ्याला एक नगरसेवक टॉर्चर करत असल्याचा आरोप होत असून , या प्रकाराला कंटाळलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पालिकेचे कर्मचारी राजू देडगे हे गेल्या सोळा वर्षांपासून पालिकेत कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती बिगारी म्हणून करण्यात आली असली, तरी ते सध्या मुकादम म्हणून काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी देडगे हे माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. परंतु माशी कुठे शिंकली हे कोणालाच समजले नाही. देडगे हे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्या जवळचे मुकादम म्हणून पालिकेत वावरू लागले.
याच रागातून सारस आपल्यावर चिडून असल्याचा देडगेंचा आरोप आहे. सारस वारंवार टार्गेट आणि टॉर्चर करत असल्याचा आरोप करत देडगे यांनी सोमवारी पालिकेत थेट सारस यांनाच याचा जाब विचारला. हा प्रकार नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्या कानावर गेल्यानंतर तेही संतापले. सचिन सारस नगराध्यक्ष असताना जयेंद्र चव्हाण आणि सारस यांच्यात शितयुद्ध झाल्याचे पालिकेतील सर्वांना ठाऊक आहे.
त्यामुळे दोघांतील मतभेदाचा राग देडगेंवर निघाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
एका नगरसेवकाने संबंधिताच्या कानाखाली थप्पड मारली, याची बातमी वाऱ्यासारखी पालिकेत पसरली. मात्र, हा प्रकार घडला तरी देडगेंनी गप्प राहणं पसंत केलंय. त्याची कारणेही ते देतायत.
‘ज्यांनी मला मारलं ते माझ्या भावासारखे आहेत. माझ्या सख्या भावांपेक्षा त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी मला मारलेल्याचे प्रकरण मला वाढवायचे नाही. परंतु जे लोक मला टॉर्चर करतायत. त्यांच्या विरोधात मी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. यातूनही मार्ग निघाला नाही तर शेवटी आत्महत्येचा माझ्यापुढे पर्याय आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य राजू देडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.’ त्यामुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता असल्याने सगळ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)
‘थप्पड प्रकरण’ वाढवायचे नाही..
नगरसेवकांकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुकादम राजू देडगेंनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ‘तुझी काही तक्रार असेल तर आम्हाला सांग, संघटना तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा असा काही प्रकार घडला, तर आपण कामबंद आंदोलन करू, असे देडगे यांना संघटनेकडून आश्वासन देण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण वाढवायचे नाही, असे देडगेंचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनाही सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे.
माझ्या कार्यकाळात पालिकेतील दहा मुकादमांची पदोन्नती मी केली आहे. मात्र त्यामध्ये देडगे यांचा समावेश केला नाही. ते बिगारी आहेत. त्यामुळेच माझ्यावर देडगेंकडून खोटे आरोप होत आहेत.
-सचिन सारस (माजी नगराध्यक्ष, सातारा पालिका)