‘हिट अँड रन’चा साताऱ्यातही धोका!
By Admin | Updated: May 13, 2015 00:51 IST2015-05-13T00:45:56+5:302015-05-13T00:51:00+5:30
ठोस उपायांची गरज : पदपथावर झोपणाऱ्या आंदोलकांसह भिकारी, मद्यपीही ठरू शकतात बळी--आॅन द स्पॉट रिपोर्ट...

‘हिट अँड रन’चा साताऱ्यातही धोका!
सातारा : अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा निकाल आणि त्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्य याने केलेले भाष्य या पार्श्वभूमीवर पदपथावर झोपण्याची अपरिहार्यता आणि त्यातील धोका हा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात रात्री पाहणी केली असता, पदपथावर झोपणाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याचे दिसून आले. मात्र, तरीही अनेक ठिकाणी धोका आहेच.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन करणारे आंदोलक रात्रीच्या वेळी समोरील पदपथावर झोपतात. सध्या धरणग्रस्तांचे मोठे आंदोलन चालले आहे. रात्री अपरात्री भन्नाट वेगाने येणारे वाहनचालक आणि दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांपासून आंदोलकांचा बचाव व्हावा, यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ ‘बॅरिकेड’ लावण्यास प्रारंभ केला. परंतु हे ‘बॅरिकेड’ सोमवारी रात्री दिसून आले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा-पंढरपूर मार्गावर असून, रात्रभर तेथे वर्दळ सुरू असते. शिवाय, महामार्गावरील ढाब्यांवर पार्टीसाठी (अर्थातच ओल्या) गेलेले तरुण बाइकर्स सुसाट वेगाने या रस्त्यावरून येतात. कृष्णानगर, संगमनगर, सदर बझार भागात जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते. धरणग्रस्तांखेरीज सध्या अन्य काही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती या दरम्यानच्या पदपथावर झोपी जात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘बॅरिकेड’ दररोज लावणे गरजेचे आहे.बसस्थानकात जाण्याच्या मार्गावरील पोर्चमध्ये अनेकजण रात्री पथारी अंथरून झोपलेले असतात. पहाटे येणाऱ्या पेपर टॅक्सींसह रात्री-अपरात्री येणाऱ्या खासगी दुचाकी-चारचाकी वाहनांची वर्दळ येथे असते. कोणत्याही कारणाने वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहन थेट झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर जाऊ शकते. छोटीशी तांत्रिक किंवा मानवी चूक पोर्चमध्ये झोपलेल्यांच्या जिवावर बेतू शकते, हे लक्षात ठेवून एसटी प्रशासन आणि बसस्थानकावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोर्चमध्ये झोपण्यास तातडीने बंदी घालण्याची गरज आहे. शहर परिसरात अनेकजण झोपल्याचे सोमवारी रात्री दिसून आले. यातील काहीजण मद्यपी होते, तर काही जण राजवाड्यावरून गावाला जाणारी गाडी चुकल्यामुळे मुक्काम ठोकून होते. वाचनालयाच्या शटरसमोर झोपलेल्यांना फारसा धोका नाही; परंतु कस्तुरबा रुग्णालयाच्या बाजूलाच उघड्यावर झोपलेले एक गृहस्थ दिसले. अशी झोप काळझोप ठरू शकते; कारण याच परिसरात काही बिअरबार, दारूदुकाने आहेत. अनेक मद्यपी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ करीत या भागातून जातात. (प्रतिनिधी)
बाइकर्सची रात्रभर धूम
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिक बाहेर फिरत असतात. तसेच रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशात क्रिकेटचा खेळही अनेक ठिकाणी खेळला जात असल्याचे दिसते. अशा वेळी काही युवक धूम स्टाईलने रस्त्यावरून दुचाकी चालवितात.
४रस्त्याने अतिवेगाने दुचाकी चालविण्याचे प्रकार रात्री नऊनंतर सुरू होत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांसह रस्त्याकडेला झोपलेल्या लोकांनाही मोठा धोका आहे. काही युवक मद्यप्राशन करून बेधुंदपणे शहरातील रस्त्यांवरून दुचाकी चालवित असल्याचे रात्रीच्या वेळी पाहायला मिळते.
स्त्रीवेश परिधान केलेला
तो तर एक पुरुषी चेहरा!
लूटमारीचा उद्देश : वेशांतर करून भीती दाखविण्याचा प्रकार
प्रदीप यादव ल्ल सातारा
वर्धनगडात रात्री सव्वाएक वाजता त्या युवकांनी जे अनुभवलं, जे पाहिलं ते थरारक होतंच; पण त्याहूनही अधिक ते अचंबित करणारं आहे. ओसाड रस्त्यावर उभी असलेली बाई पाहून क्षणभर भांबावलेल्या ते युवक धाडसाने पुढे गेले. तिच्यापासून पाच ते सहा फुटांवरून त्यांची गाडी गेली. त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणारं होतं... मध्यरात्री एका ओसाड वळणावर वाहनांना हात करणारी पांढऱ्या साडीतला त्या बाईचा चेहरा पुरुषी दिसल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला असता स्त्री वेशातील ती व्यक्ती पुरुषच असल्याचे उघड झाले आहे.
त्या दोन युवकांनी आपबिती सांगितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्याची उत्तरं शोधण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लोकवस्तीपासून दीडशे-दोनशे मीटर अंतरावर असलेलं ते ठिकाण. एका बाजूला तीव्र उतार तर दुसऱ्या बाजूला चढ असे ते वळण आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या प्लास्टिक बॅरलचे गोडावून सोडले तर आजूबाजूला जवळपास लोकवस्ती नाही. पण ज्या ठिकाणी ती व्यक्ती उभी राहते, त्याच्यासमोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. तीव्र चढ-उताराचा वळणदार रस्ता आणि स्मशानभूमी या दोन गोष्टींचा आधार घेऊन ती जागा वाटमारी करायच्या उद्देशाने निवडली असल्याचे दिसते. याबाबत काही लोकांशी चर्चा केली असता ओसाड जागी मध्यरात्री स्मशानभूमी अन् पांढऱ्या साडीतील बाई पाहून साहजिकच कुणीही घाबरून जाईल. वाहनचालकाने गाडी थांबविली तर उद्देश सफल होईल, हा संबंधित व्यक्तीचा विचार असावा, असे काही सुशिक्षितांनी सांगितले.
दुरून हा परिसरा सपाट पठारासारखा वाटत असला तरी चढउतारामुळे अनेक खड्डे तयार झालेले आहेत. त्यामुळे लपण्यासाठी याठिकाणी जागा आहे. याचाच फायदा घेऊन प्रवाशांना भीती दाखविण्याचा प्रकार याठिकाणी होत असावा. रणसिंगवाडी येथील एक जण कोरेगावहून येत असताना रात्री पावणेदहाच्या सुमारास याच ठिकाणी त्याला लुटल्याची घटना घडली होती, असे नागरिकांनी सांगितले.
या घटनेबद्दल अधिक माहिती वाचा उद्याच्या अंकात.
लोकांच्या मनात अंधश्रद्धेचा बागुलबुवा
त्या ओसाड वळणावरील भयकथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’नं वर्धनगड, रामोशीवाडी, नेर, फडतरवाडी, पुसेगाव या गावांतील लोकांशी, वाहनचालकांशी चर्चा केली. जवळपास पंधरा-वीस जणांना भेटून त्यांची मतं विचारली. मात्र, दोघे-तिघे सोडता कुणीही या गोष्टीचा शोध न घेता सुरस भयकथा ऐकविल्या. कुणी म्हणालं, अनेक वर्षांपासून त्या वळणावर असे प्रकार घडताहेत. तर कुणी सांगितलं की त्या वळणावर अनेक अपघातात घडलेत. कुणी इतर ठिकाणच्याही ऐकीव कहाण्या रंगवून सांगितल्या; पण कुणीही कधी या घटनेच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. ‘लोकमत‘नं शोध घेऊन हा प्रकार उघड करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचं भूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.