हस्तलिखित उतारे होणार ‘इतिहास’
By Admin | Updated: July 20, 2014 23:17 IST2014-07-20T23:16:38+5:302014-07-20T23:17:58+5:30
कऱ्हाड तालुका अव्वल : ‘ई-सातबारा’चे काम युद्धपातळीवर

हस्तलिखित उतारे होणार ‘इतिहास’
सातारा : सातबारा म्हटले की अगम्य अक्षरात लिहिलेला क्लिष्ट कागद ही ओळख आता मागे पडणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कऱ्हाड तालुका या कामाची पूर्तता करून जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
सातबारा भरणे, फेरफार भरणे, तलाठ्याचे संपूर्ण दफ्तर संगणकीकृत करणे, अशी कामे तहसीलदार कार्यालयात सध्या जोमात सुरू आहेत. यासाठी चौदा प्रकारचे अहवाल तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी तयार करीत आहेत. तलाठ्याच्या दफ्तरातील सर्व नोंदी आणि जमिनीशी संबंधित सर्व नोंदी आता हस्तलिखित स्वरूपात न येता संगणकीकृत स्वरूपात समोर येतील आणि कागदपत्रांमधील क्लिष्टता संपुष्टात येईल.
सातबारा संगणकीकृत करण्याचे काम क्लिष्ट स्वरूपाचे आहे. ‘एनआयसी’च्या पुणे कार्यालयाकडून उपलब्ध झालेले सॉफ्टवेअर यासाठी वापरण्यात येत असून, पाच ते सहा प्रकारचे कार्यान्वयन (युटिलिटीज) या सॉफ्टवेअरद्वारे होते. संगणकीकृत उतारा हातात मिळण्याबरोबरच सातबारा ‘आॅनलाइन’ पाहण्याची सुविधाही यामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फेरफार, खरेदीपत्र यासाठी तलाठी आणि तहसील कार्यालात होणारे हेलपाटे बंद होणार आहेत. प्रत्येक तालुक्यात ई-सातबाराचे काम प्रगतिपथावर आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील तलाठी संगणकतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे ‘डेटा एन्ट्री’साठी ते आॅपरेटरची मदत घेतात. काही तलाठ्यांनी ‘एमएससीआयटी’ अभ्यासक्रम पूर्ण केला असून, त्यांना संगणकाचे जुजबी ज्ञान आहे. काही तलाठ्यांना ‘एनआयसी’कडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. जमिनीचा आकार, क्षेत्र, पीकपाणी, खातेदाराचे नाव, कब्जेदाराचे नाव, इतर हक्कात काही नावे असल्यास ती नावे अशी साद्यंत माहिती ई-सातबारावर उपलब्ध होणार आहे.