मराठा साम्राज्याचा इतिहास जगाला प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:55+5:302021-02-09T04:41:55+5:30

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी ...

The history of the Maratha Empire inspires the world | मराठा साम्राज्याचा इतिहास जगाला प्रेरणादायी

मराठा साम्राज्याचा इतिहास जगाला प्रेरणादायी

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतीकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही; म्हणूनच आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असून, या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी केले.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी राजमुद्रा भेट देऊन योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुकही केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून, ताजमहालाच्या फाटकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय उभे राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने आग्रा येथे कैदेत ठेवले होते; पण शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्र्याहून सुटका करून घेतली. याचा प्रेरणादायी इतिहास या संग्रहालयात मांडला जाणार आहे.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या घराण्याच्या वतीने तुमचे आभार मानतो.

याप्रसंगी खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट देऊन योगी आदित्यनाथ यांचा गौरव केला. तसेच सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले. गडावरील भवानीमातेची पूजा करून अफझलखानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्याचे आश्वासन योगी यांनी दिले. यावेळी खासदार उदयनराजे यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.

फोटो ओळ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथे भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट दिली.

Web Title: The history of the Maratha Empire inspires the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.