साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित!

By Admin | Updated: April 23, 2016 00:42 IST2016-04-22T21:57:44+5:302016-04-23T00:42:30+5:30

कचऱ्याचे साम्राज्य : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दुर्लक्षित विहिरींची निगा राखण्याची गरज

Historical wells in Satara are neglected! | साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित!

साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित!

सातारा : साताऱ्यात शिवकालीन नैसर्गिक जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात या जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. शहराची मातृसंस्था असणाऱ्या पालिकेने या विहिरींची स्वच्छता मोहिम हाती घेऊन जलसाठे विकसित करावेत, अशी मागणी होत आहे.
सातारा शहराच्या प्रत्येक भागात उपलब्ध विहिरींची संख्या पाहता त्या-त्या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागू शकतो. पाण्याचे नियोजन व वापर याची सांगड घालणे गरजेचे आहे. पाणीसाठ्याचे जपणूक व जनत करणे महत्त्वाचे आहे. ‘जल है तो कल है’ हे जनतेला आता पटवून देण्याची वेळ आली आहे. पाणीबचतीचा नारा न देता तो कृतीततून सिद्ध करण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे.
साताऱ्यात जलसाठे मुबलक आहेत; पण त्याचा वापर व उपभोग घेता येत नाही, अशी अवस्था शहरवासीयांची आहे. दुष्काळाने होरपळलेली जनता भटकंती करते आणि दुसरीकडे मुबलक पाणी आहे. पण त्याचा वापर नाही, हे विदारक चित्र साताऱ्यात आहे. सातारामधील नैसर्गिक जलसाठ्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हे जिवंत पाण्याचे झरे भविष्यात मृत होतील यासाठी तरी या विहिरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पाण्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता हैराण झाली आहे. हे चित्र पाहता जीवनात पाण्याचे मोल अनमोल असल्याचे दिसते. पाणी वाचविणे हे प्रत्येक नागरिकांनी स्वीकारले पाहिजे; तरच पाणीटंचाईवर मात करता येईल. भूगर्भातील जलसाठे ही खरी जीवनदायी आहे याची जाणीव ठेवून पाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
सातारा शहरातील भूगर्भातील जलसाठे खोलवर गेले आहेत. भविष्यकाळात हे जनतेसाठी धोकादायक ठरू शकते. जलसाठ्याचे संवर्धन व निगा राखणे हे महत्त्वाचे आहे. शहराच्या अनेक भागांतील जलसाठे प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक होते; परंतु साताऱ्यात मुबलक जलसाठा असून, केवळ नियोजनाचा अभावामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उरमोडी, कास, धरणातील पाण्याच्या नियोजनावर विसंबून न राहता नैसर्गिक जलसाठ्याची निगा राखणे गरजेचे आहे.
सातारा शहरात विशेषत: गडकर आळी, शुक्रवारपेठेच्या भागात जलसाठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचा वापर झाल्यास शहरात पाणीटंचाई भासणार नाही. पाण्याची उपसा होणे आवश्यक आहे; तरच पाणी स्वच्छ राहील. (प्रतिनिधी)

जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार...
थेंब-थेंब पाण्यासाठी जनतेला कोसो मैल धावपळ करावी लागत आहे. जेथे मुबलक जलसाठे आहेत. तेथे पाण्याचे महत्त्व उमजत नाही, अशीच स्थिती सातारामधील गडकर आळी, शुक्रवार पेठेतील आहे. अनंत इंग्लिश स्कूल ते बदामी विहीरपर्यंत जवळपास चारपेक्षा अधिक जुन्या काळातील दगडी बांधीव विहिरी आहेत. या विहिरींना ऐन उन्हाळ्यात ही भरपूर पाणी आहे; परंतु या विहिरीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. विहिरीत वाढलेल्या झाडे झुडपांमुळे या विहिरी असूनही त्याचा उपयोग घेता येत नाही. पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखाच हा प्रकार

शहरातील विहिरी एकेकाळी या परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरत होत्या त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने शासनाच्या पाण्याच्या स्कीममुळे घराघरांमध्ये जलवाहिनी पोहोचली आणि या विहिरींकडे दुर्लक्ष होत गेले जलसाठे असूनही त्याचे मोल समजत नाही, हे दुर्दैव आहे.
- श्रीरंग काटेकर,
सामाजिक कार्यकर्ते, सातारा आहे.

Web Title: Historical wells in Satara are neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.