ऐतिहासिक तळ्यांना मिळणार झळाळी!

By Admin | Updated: April 2, 2016 00:04 IST2016-04-01T23:00:11+5:302016-04-02T00:04:01+5:30

अजिंक्यतारा किल्ला : ७ तळी पुनरुज्जीवनाच्या वाटेवर; पाण्याची गळतीही थांबणार

Historical pellets get to light! | ऐतिहासिक तळ्यांना मिळणार झळाळी!

ऐतिहासिक तळ्यांना मिळणार झळाळी!

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ४९ लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामुळे किल्ल्यावरील दुरवस्थेत असणाऱ्या ७ तळ्यांना नवी झळाळी मिळणार आहे. या किल्ल्यावर तब्बल ९ पाण्याची तळी आहेत. किल्ल्यावर विस्तृत पठार आहे. या किल्ल्यावर पूर्वी शेती केली जात होती. याशेतीसाठी या तळ्यांतून पाणी उपलब्ध होत होते. वन्य प्राणी, पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ही तळी भागवत असल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची संख्याही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षाच्या फेऱ्यात हा किल्ला अडकल्याने गडावरील पाण्याच्या मोठ्या तळ्यांकडे दुर्लक्ष झाले. साताऱ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नेहमीच पडतो. या किल्ल्यावरील तळी पावसाळ्यात भरतात. मात्र, पाणी गळती होऊन निघून जाते. गडावर मोजकेच पाणी शिल्लक राहत होते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी किल्ल्यावरील दोन तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या तळ्यांची गळती थांबविण्यात आली तसेच पडझडीच्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. या दोन तळ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा होत असल्याने हे पाणी किल्ल्यावर लागवड केलेल्या वृक्षांसाठी वापरले जाते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ व त्यांचे सहकारी किल्ल्यावर या वृक्षांचे संगोपन करत आहेत. जलसंधारणाचीही कामे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अजून ७ तळ्यांची दुरवस्था कायम आहे. तळ्यांमध्ये मोठा गाळ साठलेला आहे. तळ्यांची पडझड झालेली आहे. तसेच पावसाचे पाणी काही दिवसांतच गळती होऊन निघून जाते. या तळ्यांची दुरुस्ती केल्यास किल्ल्यावर पाणीसाठा होऊ शकतो. किल्ल्यावरील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यानिमित्ताने कायमस्वरूपी होऊ शकते. या हेतूने जिल्हा प्रशासनाने किल्ल्यावरील तळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)

अजिंक्यतारा किल्ल्यावरील तळ्यांसाठी निधी जाहीर झाला आहे. तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल, याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच केली जाईल. त्यानंतरच कामाचा आराखडा तयार होईल.
- शरद दाभाडकर, कार्यकारी अभियंता
उरमोडी धरण विभाग
अजिंक्यतारा किल्ल्याची उंची लक्षात घेता एवढ्या उंचीवर तळ्यांचे पुनरुज्जीवनाचे काम करणे हेच आव्हान आहे. तरी देखील उरमोडी विभागाच्या अभियंत्यांनी दोन तळ्यांचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले होते. आता इतर दुर्लक्षित तळ्यांनाही झळाळी मिळण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील पशुपक्षी व झाडांची तहान भागेल. तसेच भूगर्भातील पाणीसाठाही यानिमित्ताने वाढण्यास मदत होईल.
- डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Historical pellets get to light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.