ऐतिहासिक वस्तूंच्या स्पर्शानं सातारकर पुलकित !
By Admin | Updated: May 19, 2015 00:31 IST2015-05-18T23:07:29+5:302015-05-19T00:31:51+5:30
वस्त्र, शस्त्र, चित्र, शिल्प : साताऱ्यात पहिला जागतिक संग्रहालय दिवस उत्साहात साजरा

ऐतिहासिक वस्तूंच्या स्पर्शानं सातारकर पुलकित !
सातारा : येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालय ऐतिहासिक वस्तूंनी संपन्न आहे. सोमवारी नागरिकांनी या संग्रहालयास भेट देऊन तेथील ऐतिहासिक वस्तू जवळून पाहण्याबरोबरच त्यांना स्पर्शही केला. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या वस्तूंच्या स्पर्शाने पुलकित होण्याचा अनुभव सातारकरांनी घेतला. निमित्त होतं जागतिक वस्तुसंग्रहालय दिवसाचं.येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात पहिला जागतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सातारकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास माजी संग्रहालय अभिरक्षक प. ना. पोतदार, भास्कर मेहेंदळे, चित्रकक्ष सहायक हेमा द्रविड, विक्रांत मंडपे, जयश्री चौकवाले आदी उपस्थित होते.संग्रहालय दिवसानिमित्त सोमवारी नि:शुल्क प्रवेश देण्यात आला. इतिहासप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने संग्रहालयास भेट देऊन विविध दालनातील वस्तू पाहिल्या. संग्रहालयात वस्त्र, शस्त्र, चित्र व शिल्प असे विभाग असून नागरिकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चिकित्सक नागरिकांनी आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल माहिती घेतली. प. ना. पोतदार यांनी शिवाजी महाराज संग्रहालयाची उभारणी कशी झाली, याबाबत माहिती दिली. संग्रहालयाची गरज व अडचणी याविषयी हेमा द्रविड यांनी मार्गदर्शन केले. साताऱ्यात हा दिवस साजरा व्हावा, यासाठी जिज्ञासाच्या वतीने केलेल्या प्रयत्नांना पुरातत्व विभागाचे संचालक संजय पाटील व संग्रहालय विभागाने सकारात्मक पाठिंबा दिल्याने येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालयात सोमवारी हा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जयश्री चौकवाले यांनी प्रास्ताविक केले. नितीन पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)