हिंगणेच्या स्फोटात तीन कोटींची हानी
By Admin | Updated: February 8, 2015 00:53 IST2015-02-08T00:51:11+5:302015-02-08T00:53:00+5:30
पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट

हिंगणेच्या स्फोटात तीन कोटींची हानी
वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंग या इथेनॉल प्रकल्पाला शुक्रवार, दि. ६ रोजी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अखेर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यश आले. या आगीत प्रकल्पाची मशिनरी व बायोडिझेलचे तयार झालेले उत्पादन अशी सुमारे तीन कोटींची हानी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रकल्पावरील एका साठवण टाकीच्या झाकण दुरुस्तीचे किरकोळ काम सुरू असताना अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटात सागर कृष्णात जगदाळे (रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव) हा युवक कामगार जागीच झाला. कऱ्हाड, फलटण, म्हसवड, विटा, केन अॅग्रो साखर कारखाना येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, पाण्याच्या फवाऱ्याने आग अधिकच भडकत होती. त्यानंतर कोल्हापूर, सांगली- मिरज महानगरपालिका व नीरा, बारामती येथील नगरपालिकांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या गाड्यांनी फोमचा वापर करीत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली.
या आगीत प्रकल्पातील सात साठवण टाक्या निकामी होण्याबरोबरच साठ हजार लिटर तयार बायोडिझेल भस्मसात झाले. तर साडेसात एचपी व पाच एचपीच्या चार मोटारी जळून खाक झाल्या. तसेच एक लाख वीस हजार लिटर अॅसिड आईल ही जळून संपुष्टात आले. त्यामुळे अंदाजे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा आग आटोक्यात आल्यामुळे मोठी वित्तहानी टळण्याबरोबरच परिसरातील हिंगणे, तडवळे, मांडवे, रानमळा येथील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आज (शनिवारी) पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सकाळी पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मुदगल यांनी घटनास्थळास भेट देऊन कशामुळे स्फोट झाला, याबाबतची माहितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, प्रकल्पाचे संचालक धैर्यशील कदम, सुनीलशेठ झंवर, सुहास राजमाने, सुनील खाडे, तानाजी पवार,रणजित जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)