हिंदीला शालेय स्तरावर दुजाभाव!

By Admin | Updated: July 18, 2015 00:18 IST2015-07-17T21:56:51+5:302015-07-18T00:18:10+5:30

फक्त चार तासिका : समान परीक्षा पद्धत असताना अन्याय का?

Hinduism at school level! | हिंदीला शालेय स्तरावर दुजाभाव!

हिंदीला शालेय स्तरावर दुजाभाव!

गुलाब पठाण -किडगाव -देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला सन्मान दिला गेला; मात्र याच हिंदी विषयाला महाराष्ट्रात शालेय स्तरावर दुय्यम दर्जाची वागणूक शासन देत आहे. हिंदी विषयाला फक्त चार तासिका आहेत. समान परीक्षा पध्दत असताना असा अन्याय का? असा प्रश्न करण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये द्वितीय भाषा म्हणून हिंदी विषयाला शालेय स्तरावर पाचवी ते दहावी पर्यंत शिकवले जाते. हिंदी बरोबर मराठी व इंग्रजी विषयही शिकवले जातात. त्रिभाषा सूत्रानुसार भाषा गटासाठी एकूण १८ तासिका आहेत. त्यापैकी मराठी विषयासाठी सहा तासिका देण्यात आल्या असून, तृतीय भाषा इंग्रजीसाठी आठ तासिकांचे नियोजन वेळापत्रकात असते; मात्र हिंदी विषयाला फक्त चार तासिका देऊन गेली अनेक वर्षे
शासन दुय्यम दर्जाची वागणूक देत आहे. तिन्ही भाषांना समान गुण
आहेत. असे असतानाही हिंदी विषयावर अन्याय का असा प्रश्न निर्माण होत आहे.
सध्या समान परीक्षा पद्धती आहे. मात्र तासिका वाटपात कोठेही समानता दिसून येत नाही. त्याचा परिणाम राज्यभरातील हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित शिक्षकांवर इतर शालेय विषय शिकवण्याचा ताण येत आहे. अन्य विषयाचा अभ्यासक्रम पार पाडावा लागत आहे. त्यामुळे याचा विचार होण्याची खरी गरज असल्याचे दिसून येत आहे.
समान गुण, समान भाषा, समान तासिका या तत्त्वानुसार तासिकांची फेरवाटणी करून राष्ट्रभाषा हिंदीला शालेय स्तरावर वेळापत्रकात सहा तासिका देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने अनेकवेळा शासनाकडे केली
आहे. मात्र, अद्यापपर्यंत या विषयावर शासन उदासीनच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांत नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
तासिका वाढ संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्षांना पत्र पाठवून शालेय स्तरावर भाषा विषयांना १८ तासिका पैकी भाषानिहाय विभागणी करण्याचे सांगितले आहे. मात्र, स्पष्टपणे सहा तासिका हिंदी विषयाला देण्यात याव्यात याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भाषा विषयात सर्वात कमी तासिका हिंदी विषयाला असून, हे भिजत घोंगडे कधीपर्यंत राहणार हा संशोधनाचा भाग बनल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांतही नाराजी आहे.


महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी अद्याप नाही. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यातील महामंडळाचे पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत.
- ता. का. सूर्यवंशी, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ

पाचवीच्या नवीन अभ्यासक्रमात दुजाभाव...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ अन्वये विद्यार्थ्यांसाठी बालभारती, पुणे यांच्या वतीने पाठ्यक्रम तयार करून छापला जातो. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवीचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. जून महिन्यात सर्व विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्या हातात नवीन पुस्तके मिळाली. मात्र, नेहमीप्रमाणेच पाचवीच्या हिंदी द्वितीय भाषा ‘सुलभभारती’ पुस्तकाची छपाई मात्र दोन रंगात करण्यात आली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आकर्षक आहे. मात्र, आतील सर्वच्या सर्व चित्रे दोन रंगांत छापली गेली.

Web Title: Hinduism at school level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.