महामार्गावरील सेवा रस्ते बेजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:23+5:302021-02-08T04:34:23+5:30

खंडाळा : पुणे- बँगलोर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान ...

Highway service roads boring ... | महामार्गावरील सेवा रस्ते बेजार...

महामार्गावरील सेवा रस्ते बेजार...

खंडाळा : पुणे- बँगलोर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळणाच्या सोयीसाठी व वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी महामार्गात बदल करण्यात आले असले तरी कामे खोळंबल्याने अडचणी वाढत आहेत. वास्तविक या राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर आशियाई महामार्गात केले असले तरी सध्या हा बदल केवळ नावापुरताच दिसून येतोय. महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाल्याने लगतच्या गावांच्या अडचणींत वाढ झाल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.

पुणे-बँगलोर हा राष्ट्रीय महामार्ग ४ म्हणून ओळखला जात होता. वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी या मार्गाचे सुरुवातीला चौपदरीकरण व त्यानंतर सहा पदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामादरम्यान अनेक गावांतील रस्त्यालगतच्या अडचणी वाढत गेल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यापूर्वी केवळ नावात बदल करून त्याचे नामकरण आशियाई महामार्ग ४७ असे करण्यात आले आहे. त्यामुळे समस्या सुटलेल्या नाहीत.

खंडाळा तालुक्यात पारगाव येथील महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अंडरपास बोगदा दोन्ही बाजूंनी काँक्रीट भिंत बांधून बंदिस्त गटार करणे, अंडरपास एलईडी दिवे बसविण्यात यावेत, सेवा रस्त्यालगत दोन्ही बाजूने गटार काढणे, अशी अनेक कामे अपूर्ण आहेत. त्याचबरोबर धनगरवाडी येथील चौपाळा येथे सेवारस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने वाहतुकीस अडचण येत आहे. त्यामुळे येथे रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे.

खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या समस्या मिटल्या नाहीत. त्यामुळे नावात बदल होत असताना कामातही तत्परतेने तोडगा निघावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

कोट..

महामार्गाच्या रुंदीकरणाने दळणवळण सुविधा सुरळीत झाल्या असल्या तरी सेवा रस्ते, अंडरपास बोगदे व इतर सुविधा चांगल्या रीतीने मिळणे गरजेचे आहे. कामे अपूर्ण राहिल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. शेती कामासाठी महामार्ग ओलांडणे अवघड झाले आहे. चौपाळा येथे सेवा रस्ते व अंडरपास पूल रखडल्याने वाहनांना उलट दिशेने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यासाठी उर्वरित कामे तातडीने व्हावीत.

-चंद्रकांत पाचे, संचालक, जिल्हा खरेदी-विक्री संघ

...........................................................

०७खंडाळा

फोटो - महामार्गावर धनगरवाडी गावच्या हद्दीत चौपाळा येथे सेवा रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Web Title: Highway service roads boring ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.