विमानतळ थांब्यावर ‘हायमास्ट’चा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST2021-04-16T04:39:53+5:302021-04-16T04:39:53+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड - पाटण मार्गावरील विमानतळ बसथांब्यावर हायमास्ट दिव्यांचा टॉवर उभारण्यात आला आहे. या हायमास्ट दिव्यांमुळे रात्रीच्यावेळी परिसर ...

विमानतळ थांब्यावर ‘हायमास्ट’चा झगमगाट
कऱ्हाड : कऱ्हाड - पाटण मार्गावरील विमानतळ बसथांब्यावर हायमास्ट दिव्यांचा टॉवर उभारण्यात आला आहे. या हायमास्ट दिव्यांमुळे रात्रीच्यावेळी परिसर उजळून निघत आहे.
गुहागर - विजापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सध्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दुभाजक उभारून त्यामध्ये पथदिवे बसविण्यात आले आहेत. अद्यापही हे पथदिवे सुरू करण्यात आलेले नाहीत. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले आहे. पथदिवे सुरू झाल्यानंतर वारूंजी फाट्यापासून विजयनगरपर्यंतच्या रस्त्यावर लखलखाट होणार आहे. त्यातच आता विमानतळ थांब्यावर हायमास्ट दिव्यांचा टॉवर उभा करण्यात आला आहे. महामार्गाच्या दक्षिणेला उभारण्यात आलेल्या या टॉवरवर चारी दिशांना चार हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरात मोठा प्रकाश पडत आहे.
विमानतळ थांब्यावर चौक आहे. एक मार्ग विमानतळाकडे तर दुसरा मार्ग मुंढे गावाकडे जातो. कऱ्हाड - पाटण रस्त्याला छेदून हे मार्ग गेले आहेत. या मार्गावर पूर्वी रात्रीच्यावेळी अंधार असायचा. दाट लोकवस्ती असूनही याठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नव्हती. मात्र, सध्या हायमास्ट दिव्यांच्या लखलखाटात हा परिसर न्हाऊन निघत आहे.