सातारा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, छुप्या पध्दतीने सुरू असणारी कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे वाढविण्यासाठी केंद्र शासनानकडे पाठपुरावा व जातनिहाय जनगणना करावी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रश्न सोडवावेत, आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्यावतीने देण्यात आले आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यात अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत. त्या सोडविण्याएेवजी सरकार जातियवाद, धार्मिक संघर्ष आणि असेच अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचं दुसरीकडे लक्ष वेधत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला तडा जातोय. तसेच राज्याच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे. यात सामान्य माणसांचंच नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने काही प्रश्नांकडे लक्ष वेधत आहोत. हे प्रश्न सर्व सामान्यांशी निगडीत असल्याने शासनाच्या माध्यमातून तातडीने सोडवून दिलासा द्यावा.गेल्यावर्षी अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. दुष्काळा संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करुन सर्वच महसूल मंडळांना एनडीआरएफच्या निकषाच्या चारपट मदत देण्यात यावी. राज्यात रिक्त असणारी सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तत्काळ भरली जावीत. अवाजवी परीक्षा शुल्क परत करावे, दत्तक शाळा योजना रद्द करावी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, नोकऱ्यात स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण आणावे.मराठा समाज आरक्षणातील संभ्रम दूर करुन धनगर, मुस्लीम आणि लिंगायत समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपुढे वाढवावी. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच जातनिहाय जणगणना करावी. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, अतुल शिंदे, शफिक शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मदत, कंत्राटी भरती रद्द अन् जातनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By नितीन काळेल | Updated: February 1, 2024 19:00 IST