हॅलो..मंगळवार पेठेतून ‘वायफाय’ वर बोलतोय
By Admin | Updated: April 20, 2016 00:20 IST2016-04-19T23:24:50+5:302016-04-20T00:20:24+5:30
साताऱ्यातील पहिला प्रयोग : वॉर्ड क्रमांक १९ मध्ये सुविधेस प्रारंभ; नागरिकांमध्ये उत्सुकता

हॅलो..मंगळवार पेठेतून ‘वायफाय’ वर बोलतोय
सातारा : शहरातील मंगळवार पेठेतील वॉर्ड क्र. १९ मध्ये नगरसेवक अविनाश कदम यांच्या वार्डफंडातून वायफाय सुविधेच्या शुभारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला.
यावेळी नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, सुजाता गिरीगोसावी, अमोल मोहिते, प्रवीण पाटील आदींसह दूरध्वनी विभागाचे योगेश भागवत, मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘भीषण दुष्काळामुळे सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. सातारा शहरातही काही भागांत पाणीपुरवठ्यासंदर्भात त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. कोल्हापूरसह अनेक मोठ-मोठ्या शहरांमध्ये एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आपल्या शहरात मात्र आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. शहरातील बहुतांश भागांत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासह सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. अशा विकसित वार्डांमध्ये अत्याधुनिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा शहराला स्मार्ट सिटी बनवणार आहे,’
नगरसेवक अविनाश कदम यांच्या वॉर्ड फंडातून वार्ड क्र. १९ मधील मंगळवार पेठेत दूरध्वनी केंद्राजवळ अत्याधुनिक वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही यंत्रणा दूरध्वनी केंद्रापासून २०० मीटर व्यासात चालू करण्यात आली आहे.
या सुविधेमुळे नागरिकांना अत्याधूनिक तंत्रज्ञानाशी निगडीत ई बँकिंग, ई बिलिंग, इंटरनेटसह मुलांसाठी शालेय माहिती आदी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या काही निकषांमध्ये न बसल्याने सातारा शहराचा शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होऊ शकला नाही.
असे असले तरी आपण नागरी सुविधांसह विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण योजना आणि
उपक्रम राबवून आपले शहर स्मार्ट बनविण्यास प्राधान्य देणार आहोत. (प्रतिनिधी)
हा वॉर्ड बनतोय हायटेक !
दोन वर्षांपूर्वी याच वॉर्डात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून साताऱ्यातल पहिला सुरक्षित वॉर्ड म्हणून या वार्डकडे पाहिले जाते. या सुविधेमुळे या वॉर्डातील गुन्हेगारीला आळा बसला असून, नागरिक आणि खास करून महिलांची सुरक्षितता वाढली आहे. आता याच वॉर्डातून आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेटचा फायदा नागरिकांना मिळावा, यासाठी वायफाय यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचे मंगळवार पेठेतील नागरिकांनी स्वागत केले आहे.