नंदनवनाच्या वाटेवर खड्ड्यांचा नरक!
By Admin | Updated: November 11, 2014 23:25 IST2014-11-11T21:05:05+5:302014-11-11T23:25:51+5:30
महाबळेश्वर-पाचगणी : पर्यटक फिरवताहेत पाठ; बांधकाम विभागाची खड्डे मुजविण्याची लगबग

नंदनवनाच्या वाटेवर खड्ड्यांचा नरक!
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीमधील रस्त्यांना सध्या खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. परिणामी पर्यटकांतून नाराजीचे सुर तर उमटत आहेच परंतु खड्ड्यांमुळे वाहनांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्यटक देखील या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर ते पाचगणी हे अंतर जवळपास १९ किलोमीटर इतके आहे. याठिकाणी सलग चार महिने कोसळणाऱ्या मुसळाधार पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाखोंचा निधी पाण्यात जातो. खराब रस्त्यामुळे या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.
याबरोबरच वाहनांचे नुकसान होऊन वाहने देखील खिळखिळी होऊ लागली आहेत. महाबळेश्वरमधील टॅक्सी व्यावसायिकांसाठी ही मोठी डोकेदुखी झाल्याने त्यांना बऱ्याचदा पाचगणी ट्रीप रद्द करावी लागत आहे. अशीच स्थिती पाचगणीमधील व्यावसायिकांची देखील आहे.
महाबळेश्वरमध्ये सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पर्यटक व स्थानीक व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे् निर्माण झाली आहेत. मात्र १९ किलोमीटर रस्त्याचा वनवास कायमचा कधी संपणार? हा यक्षपश्न सर्वांच्यापुढे उभा ठाकला आहे. (प्रतिनिधी)
पाचगणीतील रस्त्यांची अवस्था जैसे-थे
पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, या रस्त्याची जणू चाळणच झाली आहे. रस्ते म्हणजे ‘असून अडचण तर नसून खोळंबा’ अशीच स्थिती सध्या पहावयास मिळत आहे. खराब रस्त्यामुळे गेल्या महिन्यात पाचगणी व्यापारी असोसिएशनने दोन दिवस बेमुदत संप पुकारल्याने बांधकाम विभागाच्या अभियंतांनी या घटनेची दखल घेऊन या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली होती. यावेळी ‘विधानसभेच्या निवडणुका असून, आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे १६ आॅक्टोबरनंतरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. यानंतर व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतला होता; आता निवडणुका होऊन गेल्या तरी बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाकडे याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
अर्धातास ‘खड्ड्यात’...
महाबळेश्वर-पाचगणी हे अंतर १९ किमी इतके आहे. पूर्वी महाबळेश्वरहून पाचगणीकडे जायला ३० मिनीटे लागत होती, मात्र खड्ड्यांमुळे आता हे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागत आहे. विशेष म्हणजे महाबळेश्वरहून ३२ किमी अंतरावर असणाऱ्या वाईला जाण्यासाठी पूर्वी एक तास इतका वेळ लागत होता.
एसटी’ही तोट्यात
एसटीसह सुमारे ८० टक्के वाहने महाबळेश्वर-पाचगणी या मार्गावरूनच वाहतूक करतात. खड्ड्यांमुळे या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. याचा ‘एसटी’ला ही फटका बसत आहे. एसटीचे पाटे तुटने, टायर पंक्चर होणे अशा घटना वारंवार घडत आहे.