साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:31+5:302021-07-22T04:24:31+5:30

सातारा : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० ...

Heavy rains in Satara and western parts! | साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर !

साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर !

सातारा : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलिमीटरहून जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली तर कोयना धरणात २४ तासांत सव्वातीन टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणात ५७.३५ टीएमसी साठा झाला होता. सातारा शहरात तर बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता.

जिल्ह्यात दडी मारुन बसलेल्या पावसाला मागील १२ दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सुरुवातीच्या काही दिवसात पश्चिम भागात रिमझिम स्वरुपात पाऊस पडत होता. त्यानंतर हळूहळू पाऊस जोर धरु लागला. यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला तर गेल्या चार दिवसांपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे जोरदार वृष्टी होत आहे. साताऱ्यासह परिसरातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. पूर्व भागातही अधूनमधून सरी पडत आहेत.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर १०९ मिलिमीटर पाऊस पडला तर जूनपासून आतापर्यंत १,५१० मिलिमीटरची नोंद झाली आहे. नवजाला सकाळपर्यंत १४८ व यावर्षी आतापर्यंत २,१२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला १४० आणि जूनपासून आतापर्यंत २,०८३ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५७.३५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात सव्वातीन टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ३२,२०७ क्युसेक वेगाने पाणी येत होते.

.....................................................

Web Title: Heavy rains in Satara and western parts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.