पुसेगावसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:19+5:302021-09-07T04:47:19+5:30
पुसेगाव : पुसेगावसह परिसरामध्ये सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसाने दोन तास झोडपून काढले. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी ...

पुसेगावसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले!
पुसेगाव :
पुसेगावसह परिसरामध्ये सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसाने दोन तास झोडपून काढले. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. पुसेगावमधील सखल भागातील रस्ते जलमय झाले.
सध्या पुसेगाव-लातूर रस्त्याचे काम गावातील मुख्य बाजारपेठेत सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा नाल्याची कोणतीही सुविधा न केल्याने बऱ्याच दुकानात पावसाचे पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस पोषक असला तरी खरीप हंगामातील काही शेतकऱ्यांची पिके सोयाबीन, घेवडा तसेच कडधान्य यासारखे खरीप हंगामातील अगाप पेरणी झालेली पिके सध्या काढण्याच्या मार्गावर असून, अशा शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. मागास पेरणी केलेली या पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याचे बोलले जात आहे.
खटाव तालुक्यातील उत्तर भागामध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. खरिपाच्या पेरणीनंतर वारंवार या भागाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, घेवडा आदी पिके पावसाअभावी सुकून चालल्याने काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, घेवडा पिकांना हा पाऊस पोषक असल्याने उत्पादनात वाढ होण्याचा चांगला फायदा झालेले शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. मात्र, सध्या या भागात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आजच्या मुसळधार पावसामुळे या लागणी लांबण्याची शक्यता आहे.
(चौकट)
पाणी दुकानांत... व्यापाऱ्यांचे नुकसान!
पुसेगाव-लातूर रस्त्याचे काम गावातील मुख्य बाजारपेठेत सुरू आहे; मात्र शासकीय विद्यानिकेतनपर्यंत काम झाल्यावर गावातून रस्त्याच्या दुतर्फा बांधीव भुयारी नाले, रस्त्याकडेच्या विजेच्या खांबांचे स्थलांतर, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे पुनर्व्यवस्थापन करण्याचे ठरलेले काम संबंधित ठेकेदाराने न करताच रस्त्याचे काम पुसेगाव पोलीस ठाण्यापर्यंत केले. नाल्याची कोणतीही सुविधा न केल्याने बऱ्याच दुकानात आजच्या पावसाचे पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांनी केली आहे.
०६पुसेगाव
पुसेगावसह परिसरामध्ये सोमवारी झालेल्या पावसाने सखल भागातील रस्ते जलमय झाले होते.