नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे सहा तालुक्यांतील शाळांना आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक तालुक्यांतील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. लोकांचे स्थलांतर सुरू आहे. तसेच कोयना धरणाचा साठा १०० टीएमसी पार गेल्याने रात्री दरवाजे १३ फुट उचलून ९३ हजार तर पायथा वीजगृहासह एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यात एकसारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. तसेच प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे विसर्गातही वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा १००.३९ टीएमसी झाला होता. त्यातच धरणात ९१ हजार २७१ क्यूसेक आवक होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रात्री आठ वाजता धरणाचे दरवाजे १३ फुटांपर्यंत वर उचलून ९३ हजार २०० क्यूसेक तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
पाटण तालुक्यात हेळवाकजवळ पूल पाण्याखाली गेल्याने कऱ्हाड-चिपळूण या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव पुलासह निसरे आणि तांबवे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे इतर मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. पाटण तालुक्यातीलच हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने ५ कुटुंबातील १० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रासाटी येथे रस्त्यावर झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प होती. सातारा तालुक्यात वेण्णा नदीला पूर आल्याने हामदाबाज- किडगाव आणि करंजे-म्हसवे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. खंडाळा तालुक्यातही काही पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.
प्रमुख ६ धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक विसर्ग; नद्यांना पूर
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख सहा प्रकल्पांत सुमारे १४३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९६ टक्के हे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. या सहा धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. यामुळे वेण्णा, कोयना, कृष्णा, उरमोडी नद्यांना पूर आलेला आहे.
वाई, महाबळेश्वर, कऱ्हाडला स्थलांतर
महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी नदीकाठच्या येरणे बुद्रुक गावातील आठ कुटुंबातील १८ जणांना, वाई शहरातील ४० कुटुंबे, कऱ्हाड शहरात पत्राचाळ अन् पाटण काॅलनीतील २१ कुटुंबातील ८१ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.