कऱ्हाड तालुक्याला बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाते तुडुंब भरून वाहू लागले. या वेळी काही ओढे प्रवाहित न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. गोटे येथे ओढा तुंबून महामार्गावर पाण्याचा डोह तयार झाला. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गुरूवारी दुपारनंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र, गुरूवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरला. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या मध्यम सरी कोसळत होत्या.
सलग दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही शेतांमध्ये पाण्याचे तळे साचले असून वीटभट्ट्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे टोमॅटोसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खोडशी येथे कृष्णा नदीवर असलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तसेच इतर विभागातील तलावही पहिल्याच पावसात भरले आहेत.
- चौकट
चोवीस तासांत ४१४ मिमी पाऊस
कऱ्हाड तालुक्यात गत चोवीस तासांत एकूण ४१४.०० मिमी एवढा पाऊस पडला. त्यामध्ये कऱ्हाड २०, मलकापूर २२, सैदापूर २२, कोपर्डे २१, मसुर २१, उंब्रज ३५, शेणोली ३२, कवठे ४६, काले ५५, कोळे ४५, उंडाळे ६०, सुपने २४, इंदोली ११ मिमी असा सरासरी ३१.८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
फोटो : १८केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर असलेला खोडशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. (छाया : अरमान मुल्ला)