परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस
By Admin | Updated: August 24, 2014 22:24 IST2014-08-24T22:24:49+5:302014-08-24T22:24:49+5:30
दहा घरांची पडझड : ताली फुटल्याने पिके वाहून गेली; लाखो रुपयांचे नुकसान

परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस
परळी : परळी खोऱ्यातील कुरुण, काळोशी, करंजे तर्फ परळी या तीन गावांसह यवतेश्वर डोंगराच्या सात किलोमीटर परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला. यामध्ये दहा घरांची पडझड झाली असून, ओढे, नाले, ताली भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साचले होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कुरुण, काळोशी, करंजे तर्फ परळी या तीन गावांत काल, शनिवारी दुपारी सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी, ओढे, नाले भरून वाहत होते. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. पावसाचे तांडव सुमारे तासभर सुुरू होते. तिन्ही गावांतील दहा घरांच्या भिंती कोसळल्या. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी मोठे नुकसान झाले. रस्ते, नदी, नाले, बंधारे भरून वाहत होते. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने भातशेती वाहून गेली. शशिकांत देशमुख, बबन देशमुख, व्यंकट पवार, रामदास देशमुख, बबन डफळ, सूर्यकांत डफळ, यशवंत डफळ, रवी निकम यांच्या शेतीचे नुकसान झाले. अंबवडे-लावंघर रस्त्यावरील पूल, चिकणेवाडी रस्ता पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. काही परिसरात रस्त्यावर झाडे पडली होती. अनेक ठिकाणी रस्ते खचले होते. या घटनेची माहिती संबंधित विभागाला दिली असता गावकामगार तलाठी वाडकर यांनी नुकसानीचे पंचनामे केले. (वार्ताहर)