डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:22+5:302021-08-26T04:42:22+5:30
खटाव : कोरोनाचे सावट अजून पूर्णपणे गेले नसतानाच बदलत्या हवामानामुळे खटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि डेंग्यूसदृश ...

डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
खटाव : कोरोनाचे सावट अजून पूर्णपणे गेले नसतानाच बदलत्या हवामानामुळे खटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.
खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवत गावात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तर डासांचे वाढते प्रमाण पाहता डेंग्यू हा डासांपासून पसरतो त्याकरिता वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे असल्यामुळे आता आरोग्य विभागाने आशा सेविकामार्फत सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या कठीण काळात स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या आशाताईंवर डेंग्यूच्या विरोधात पुन्हा एकदा लढा देण्याची जबाबदारी आली आहे.
या कामी शीला कुंभार, बाळुताई डेंगळे, संगीता दरेकर, द्राक्षा कांबळे, मनीषा ईगावे, नीता जाधव, रुपाली शिंदे, सुनीता कदम, रोहिणी झिरपे आदी आशाताई कामाला लागल्या आहेत.
खटावमधील आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांच्या माध्यमातून सध्या घरोघरी जाऊन कंटेनर तपासणी करत आहेत. घरात असणाऱ्या साठवणुकीच्या पाण्याच्या टाक्या तसेच घराशेजारी असणाऱ्या अनावश्यक साहित्य, जेथे-जेथे डासांची उत्पत्ती होते. अशा ठिकाणी हॅबिट औषध टाकण्यात येत आहे. युद्धपातळीवर आरोग्य विभागाने हे काम सुरू केले आहे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक चाचण्या करून करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
२५ खटाव
कॅप्शन : खटावमध्ये घरोघरी जाऊन आशा सेविकांनी कंटेनर तपासणी केली.