खापर फोडण्यासाठी डोक्याचा शोध!

By Admin | Updated: August 9, 2015 23:40 IST2015-08-09T23:40:51+5:302015-08-09T23:40:51+5:30

पालिकेतील टोलवाटोलवी : हाताने मैला साफ केल्याचा प्रकार उघड झाल्याने सगळेच भयग्रस्त

Head search to break the pitcher! | खापर फोडण्यासाठी डोक्याचा शोध!

खापर फोडण्यासाठी डोक्याचा शोध!

राजीव मुळ्ये-सातारा -कोण म्हणतं चोर आलेच नाहीत? कोण म्हणतं या केवळ अफवाच आहेत? व्हॉट्सअ‍ॅपसाठी मारलेला ‘नेटपॅक’ इतका वाया कसा जाईल? चोर खरोखर आलेत... फाटक्या वस्त्यांमध्ये शिरलेत. या चोरांना सोनं-नाणं नकोय. पैसा-अडका नकोय. ते चोरतायत फक्त निखारा विझलेल्या चुली... हिसकावायचाय त्यांना चिल्ल्या-पिल्ल्यांचा भाकरतुकडा!
चूल चोरीला गेल्याची ‘अफवा’ ऐकून ‘लोकमत’ने तिचा छडा लावायचं ठरवलं. गाठली अशीच एक फाटकी वस्ती. सतरा-अठरा घरांची. घरं कसली? राहुट्याच त्या. पण वीस वर्षं एकाच जागी घट्ट आहेत. देगाव फाट्यावर पडीक जमीन भाडेपट्ट्यानं घेऊन दाटीवाटीनं राहतायत पन्नासेक माणसं. काही सोलापूर जिल्ह्यातून आलेली, तर काही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातली. घरटी दोन-तीन माणसं सकाळी निघतात. गावोगावी जातात. जोरजोरानं ओरडून वेगवेगळ्या वस्तू विकतात. कमाई बेतास बेत. चूल पेटण्याएवढी. हीच चूल आता चोरीला गेलीय. कारण फिरस्त्यांना अडवलं जातंय गावच्या वेशीवर. ‘इथं धंदा करायचा नाय,’ असा भरला जातोय दम. कारण..? गावातलं काही चोरीला गेलं तर..?
वस्तीत राहतात बहुरूपी आणि बागडी समाजातले लोक. यातले काही जण चटया विकतात. काहीजण भांडी, तर काही जण तक्ते, गोष्टीची-जनरल नॉलेजची पुस्तकं आणि नकाशे. पण कुठल्याही नकाशावर त्यांना स्थान नाहीच. आजकाल कुणीही अंगावर धावून येतो. माल ताब्यात घेऊन दरडावतो. सरकारी कामासाठी चालणारं आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी काहीही दाखवलं तरी विश्वास ठेवत नाही. काही जण दुचाकीवरून गावोगाव फिरणारे, तर काही जण एसटीनं, वडापनं जाणारे. दुपारी चारपर्यंत होईल तेवढा गल्ला घेऊन घरी येऊन रोजचा किराणा रोज आणणारे. हे सगळंच आता एकदम ठप्प!


दंडवसुली कुणाच्या परवानगीनं?
फिरस्त्यांपैकी काहीजण अ‍ॅल्युमिनियमची भांडी विकतात. त्या मोबदल्यात पैसे किंवा भंगार घेतात. भंगार वाहून नेण्यासाठी एक टेम्पो त्यांच्याकडे आहे. तीन गावांमध्ये हा टेम्पो अडवण्यात आला. सरपंचांना बोलावलं. टेम्पो सोडायचा असेल तर दंड भरावा लागेल, असं सांगितलं. दोन गावांत दंड वसूलही केला गेला; पण त्याची पावती दिली नाही, असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
शाळेतून येऊ लागले निरोप
आपण फिरस्ते विक्रेते असलो, तरी पोरांनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, असं या मंडळींना वाटतं. जवळच्याच शाळेत जाणारी किमान पंधरा मुलं वस्तीत आहेत. पण जिथं मुलांना खायला काय घालायचं, असा प्रश्न आहे तिथं शाळेची फी कुठून भरणार? फीसाठी आता या लोकांना शाळेतून निरोप येऊ लागलेत.

माल केला परत
तक्ते, अंकलिपी, गोष्टींची पुस्तकं, चटया, भांडी असा माल या विक्रेत्यांनी स्थानिक आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांना परत केलाय. व्यापारी म्हणाले, ‘असू दे माल. जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा पैसे द्या.’ पण चंद्रमौळी झोपडीत पाणी घुसून माल खराब झाला तर..? त्यापेक्षा माल परत करून वस्तीतले काही जण सध्या आपापल्या मूळ गावी परतलेत.

ओळखपत्र तरी द्या!
चोरट्यांच्या अफवांमुळं अशा अनेक वस्त्या जर्जर झाल्यात. शेवटी ‘सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स’ने (सिटू) हा प्रश्न हाती घ्यायचं ठरवलंय. फिरस्त्या विक्रेत्यांना पोलिसांनी ओळखपत्र द्यावं, किमान संबंधिताचा फोटो लावलेलं एखादं पत्र तरी द्यावं, अशी मागणी संघटना करणार आहे. अफवांमुळं ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झालाय, त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असं आवाहन ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे यांनी केलंय.

विश्वास आहे म्हणूनच...
व्यवसाय ठप्प झाल्यानंतर या मंडळींनी आधी एकमेकांकडून पैसे उसने घेतले. नंतर आसपासच्या लोकांकडे मागायला सुरुवात केली. जवळच छोटंसं दुकान असलेला रमजान कुरेशी अनेकांच्या मदतीला धावला. पैसे परत मिळतील, याचा त्याला विश्वास आहे. असे अनेक ‘दाते’ परिसरात आहेत. त्यांचा विश्वास आहे तर गावकरी का विश्वास ठेवत नाहीत आमच्यावर, असा या मंडळींचा सवाल आहे.

मी १५ ते २० गावांत पुस्तकं आणि तक्ते विकतो. अफवा सुरू झाल्यापासून आम्हाला वेशीवरच अडवतात. गावात व्यवसाय करू देत नाहीत. ओळखपत्र दाखवूनसुद्धा गावात घेत नाहीत.
- परशुराम विभुते

गावोगाव जाऊन मी चटया विकते. आम्ही कधीच चोऱ्या केलेल्या नाहीत. पण तरी आमच्यावर संशय घेतात. आता आमदनीच पूर्ण थांबलीय. मुलाबाळांना काय खायला घालायचं मी?
- कमल बागडी

टेम्पो घेऊन भंगार गोळा करणं आणि त्या मोबदल्यात अ‍ॅल्युमिनियमची भांडी विकणं हा माझा व्यवसाय. पण दोनदा टेम्पो अडवल्यावर मी तो गावीच पाठवून दिलाय. मालही परत केलाय.
- जितेंद्र बागडी

वस्तीत शिक्षणाबद्दल सगळे जागरूक आहेत. मी स्वत: डी. एड. केलंय. पण नोकरी नाही. आमच्या वस्तीतला शिवराज विभुते
हा एम. एस. डब्ल्यू. करतोय.
- बाबू सितारे

Web Title: Head search to break the pitcher!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.