पाहावयास गेले, बंधारा बांधून आले!

By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:02:55+5:302014-12-02T00:19:58+5:30

वाघोशी शाळा : परिसर भेट आयोजनात उपक्रम

He went to see, the bund was built! | पाहावयास गेले, बंधारा बांधून आले!

पाहावयास गेले, बंधारा बांधून आले!

खंडाळा : अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे. प्रत्यक्षात घेतलेले ज्ञान हे चिरकाल टिकणारे असते. म्हणूनच शालेय अध्यापनाबरोबर शेती, उद्योग, व्यवसाय यांचीही माहिती व्हावी, यासाठी खंडाळा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमधून एकाच दिवशी परिसर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले तर वाघोशी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तर पाणी साठवण बंधारे पाहावयास गेले आणि त्यातून प्रेरणा घेऊन चक्क वनराई बंधारा बांधूनच आले. या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
खंडाळा तालुक्यात एकूण ११८ प्राथमिक शाळा आहेत, या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी परिसर भेटीचा उपक्रम राबविण्याची कल्पना सुचविली. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक शाळेने विविध ठिकाणी भेटी दिल्या. वाघोशी येथील विद्यार्थी तर बंधारे पाहण्यास गेले असता त्याबद्दलची माहिती व उपयोगिता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनीच शिक्षकांजवळ बंधारा बांधण्याचा हट्ट धरला. त्यानंतर या चिमुकल्या हातांनी अवघ्या काही तासांतच वनराई बंधारा बांधून जलसंधारणाचे प्रत्यक्ष काम करून दाखविले. त्याचबरोबर पिसाळवाडी येथील विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन स्वच्छ व शुद्ध पाण्याची माहिती घेतली. शिरवळ शाळेने गटशिक्षणधिकाऱ्यांसमवेत ऐतिहासिक सुभानमंगल किल्ल्यास तर वाठार बुद्रुक शाळेने वीर धरण, खेड बुद्रुक शाळेने कुंभारकाम, वीटभट्टी तसेच पिंपळाचा मळा शाळेने प्रत्यक्ष शेती, पशुपक्षी व रानमेवा याबाबतची माहिती घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंदही गगनात मावेनास झाला होता. या भेटींमध्ये गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखही सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)



तालुक्यातील शाळांची गुणवत्ता टिकून राहावी व मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. परिसर भेटीतून एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना अनुभव घेता आला. हे ज्ञान मुलांच्या स्मरणात कायम टिकणारे असते. शिक्षकांसाठीही काव्यसंमेलन, सांस्कृतिक मेळावा घेण्याचा विचार आहे.
-संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, खंडाळा

Web Title: He went to see, the bund was built!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.