त्यांनी सही न केल्याने कर्जमाफी परत गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:56 IST2015-04-15T21:44:46+5:302015-04-15T23:56:29+5:30
इंद्रजित मोहिते : टेंभू येथे आयोजित ‘कृष्णा’ संघर्ष दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

त्यांनी सही न केल्याने कर्जमाफी परत गेली
कऱ्हाड : पाच वर्षापूर्वी आमच्या संचालक मंडळाने शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेत कारखान्याच्या जलसिंचन योजनांचा समावेश केला. त्याद्वारे तब्बल ८ कोटी रुपयांची कर्जमाफीही मिळाली. परंतु विद्यमान अध्यक्षांनी संबंधीत कागदपत्रावर सही न केल्यामुळे मिळालेली कर्जमाफी परत गेली. याला सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. यासह अनेक बाबींमधून सभासदांचे अर्थिक नुकसान या मंडळींनी केले आहे. अशी टीका डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
टेंभू, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येवू घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोजीत संघर्ष दौऱ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चरेगावकर होते. कारखान्याच्या माजी संचालिका वर्षाराणी पाटील, भास्कर पाटील, सयाजीराव पाटील, अधिकराव नलवडे, अशोक जाधव, राजाराम बाबर, शेरेचे दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कुंभार, संदिप भुसारी, युवराज भोईटे, नागराज शिंदे, मधुकर पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुहास महाडीक यांची उपस्थिती होती.
डॉ. मोहिते म्हणाले, कारखान्याच्या टेंभू जलसिंचन योजनेची पाच वर्षापूर्वी अत्यंत भक्कम परिस्थिती होती. मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. गेल्या पाच वर्षात सभासदांना २५० ते २७५ रुपयांनी सरासरीपेक्षा ऊसदर कमी मिळाला आहे. विद्यमान अध्यक्ष कारखान्यात सगळेच विक्रमी आहे असे सांगतात. तर मग इतरांपेक्षा दर का कमी मिळत आहे. याचा खुलासा का करत नाहीत. पाच वर्षापूर्वी सहवीजनिर्मितीसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प कारखान्यात उभारल्यामुळे सध्या कामगारांचे पगार तरी देणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले. सुहास महाडीक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात प्रत्येक गोष्ट ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे केली. त्यामुळे सभासदांच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी सभासदांच्या संसाराची थट्टा केली आहे. येत्या निवडणूकीत सभासद सत्ताधाऱ्यांचा प्रगतीऐवजी चाललेला ढोंगी कारभार उधळून लावतील व सभासदांची मालकी अबाधीत राखण्यासाठी यशवंतराव मोहितेंच्या विचाराला साथ देतील, असा विश्वास मोहीते यांनी व्यक्त केला.