‘तो’ पुन्हा कॉलनीत डोकावून गेला!
By Admin | Updated: October 6, 2015 23:44 IST2015-10-06T21:40:53+5:302015-10-06T23:44:59+5:30
शाहूनगरात नागरिकांच्या अंगावर काटा : नागरी वस्तीत बिबट्याची वाढती भटकंती; आपत्कालीन व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर--आॅन दि स्पॉट...

‘तो’ पुन्हा कॉलनीत डोकावून गेला!
राजीव मुळ्ये -सातारा --शाहूनगर परिसरातील कॉलनीत राहत्या घरासमोरून पाळीव कुत्र्याला रविवारी रात्री बिबट्याने अलगद पळवून नेल्यानंतर सोमवारी रात्रीही तो कॉलनीत फेरफटका मारून गेला. कॉलनीतल्या नागरिकांना त्याचं वारंवार दर्शन घडत असल्यामुळं वन विभाग आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमधून आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.साताऱ्याच्या आसपासच्या डोंगरांवर बिबट्याचा वावर नवा नाही. परंतु वसाहती वाढत चालल्या आहेत आणि डोंगराला खेटून असलेल्या वसाहतींना बिबट्याचे दर्शन होणंही स्वाभाविक आहे. शाहूनगर परिसरातील मंगळाई कॉलनीत रविवारी रात्री जे घडलं, ते पूर्वीही अनेकदा घडलंय. डोंगरकुशीतल्या इमारतीच्या वऱ्हांड्यातून पाळीव कुत्रा रविवारी रात्री अचानक गायब झाला. दहा ते साडेबाराच्या दरम्यान बिबट्याने डाव साधला असावा, हा कयास खरा निघाला. चार फूट उंचीच्या या वऱ्हांड्यावर बिबट्याने उडी मारल्यानंतर त्याच्या चिखलाच्या पावलाचा ठसा भिंतीवर उमटला. बिबट्याची येतानाची आणि जातानाचीही पावलं नुकत्याच झालेल्या पावसामुळं ओल्या मातीत दिसतायत. दरम्यान, सोमवारी रात्री दोन वाजता काही तरुणांनी याच इमारतीच्या टेरेसवरून बिबट्या कॉलनीत आल्याचं पाहिलं. थोडा वेळ शोधाशोध करून तो निघून गेला. खरं तर हा ‘तो’ नसून ‘ती’ असण्याची शक्यता अधिक आहे. बछड्यांना भोजन म्हणून ती शिकार शोधत असावी आणि त्यासाठी कॉलनीतल्या कुत्र्यांच्या मागावर येत असावी. जिथून रविवारी बिबट्याने लॅब्रेडॉर कुत्रा पळवला, त्या सुमारे पन्नास फूट लांबीच्या प्रशस्त वऱ्हांड्यात पूर्वी अनेक भटकी कुत्री आश्रयाला असत. आता त्यांचा मागमूसही दिसत नाही. कॉलनीत खाद्य मिळतंय, याची बिबट्याला झालेली खात्री झालीय आणि त्याच्या चकरा वाढल्यात, हे स्पष्ट करणाऱ्या या घटना आहेत. डोंगरउतारावर अनेकदा शहरातल्या शेळ्या चरायला नेल्या जातात. बिबट्यानं आतापर्यंत तीन बोकड आणि एक शेळी फस्त केलीय. वन विभागाने मालकांना भरपाईही दिलीय. याच डोंगराच्या दक्षिणेकडच्या उतारावरून खाली उतरल्यास थेट महामार्गावर येता येतं. तिथं, खिंडवाडीजवळ सव्वा वर्षाच्या अंतराने दोन बिबटे अज्ञात वाहनाच्या धडकेनं मृत्युमुखी पडलेत. शुक्रवारी (दि. २) पहाटे पोवई नाक्यावर दिसलेले दोन प्राणी बिबट्याचे काळे बछडे असण्याची शक्यता अद्याप वन विभागाने नाकारलेली नाही. या सर्व बाबी सक्षम आपत्कालीन व्यवस्थापनाची गरज स्पष्टपणे सांगत आहेत.
असे असू शकते आपतकालीन व्यवस्थापन
बिबट्याप्रवण क्षेत्रातील नागरिक आणि वनविभागात सातत्याने सुसंवाद
बिबट्यामुळे नुकसान झाल्यास कागदपत्रांचे ढीग न साचू देता भरपाईची हमी
बिबट्याच्या स्वभाव, तो दिसल्यास काय करावे-काय टाळावे, याबाबत विस्तृत प्रबोधन
आपतकालीन व्यवस्थापनासाठी स्थानिक तरुणांचा गट तयार करून त्यांना प्रशिक्षण
परिसरातील बिबट्यांचे वनविभागाकडून सातत्याने निरीक्षण
नागरी वस्तीबाहेर बिबट्याला खाद्य, पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
बिबट्या
पूर्ण वाढ
झालेला
ज्यांचा कुत्रा बिबट्याने पळवून नेला, ते घोरपडे कुटुंबीय गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी कॉलनीत राहायला आले आहेत. दत्तात्रय घोरपडे बांधकाम व्यवसायात असून, त्यांचे बंधू कृष्णा यांचा औद्योगिक वसाहतीत कारखाना आहे. या दोघांसह कॉलनीतल्या अनेकांना बिबट्या दिसला आहे. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आणि चपळ असल्याचं कॉलनीतले लोक सांगतात.
सावधान... रात्र बिबट्याची आहे!
रात्री अकरा ते दोन या कालावधीत बिबट्याचा नागरी वसाहतीच्या जवळपास वावर आहे. अनेकजण या काळात घराबाहेर राहणे टाळू शकत नाहीत. अशा अनेकांना बिबट्याने दर्शन दिल्याचे किस्से शाहूनगर भागात ऐकायला मिळतात. डोंगराच्या अगदी जवळ असलेल्या गोठ्याजवळही बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसतात. बिबट्या मोठ्या जनावरांवर हल्ले करीत नसला, तरी सावध राहण्यास एवढं पुरेसं आहे.