कोरोना रुग्णांसाठी ‘तो’ बनला देवदूत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:51+5:302021-06-06T04:28:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपर्डे हवेली : कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णाच्या सहवासात जायला नातेवाईकही धजावत नाहीत. अनेकवेळा बाधिताला रुग्णालयात नेण्यासाठी ...

कोरोना रुग्णांसाठी ‘तो’ बनला देवदूत!
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णाच्या सहवासात जायला नातेवाईकही धजावत नाहीत. अनेकवेळा बाधिताला रुग्णालयात नेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही; पण कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेलीचा युवक स्वत:च्या वाहनातून रुग्णांना दवाखान्यात पोहोचवतोय. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या सर्व तपासण्या होऊन त्याला अॅडमिट करेपर्यंत तो रुग्णालय सोडत नाही, हे विशेष.
कोरोना काळात माणुसकी लोप पावत असताना कोपर्डे हवेलीतील किशोर साळवे या युवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आजअखेर त्याने दीडशेहून जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांना स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत केली आहे. या नि:स्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे तो रुग्णांसाठी देवदूतच ठरला आहे. कोपर्डे हवेलीतील सर्वसामान्य कुटुंबातील किशोरने औद्योगिक प्रशिक्षण घेतले असून, तो सध्या शेती करतो. दोन एकर शेतीवर त्याचे कुटुंब चालते, अशी सामान्य परिस्थिती असतानाही किशोर एक रुपयाही न घेता जीपमधून रुग्णांची वाहतूक करत आहे.
गत दीड महिन्यापासून तो गावातील कोरोना रुग्णांसाठी धडपडत आहे. ज्या घरात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून येतो, त्या घरी जाऊन त्याची विचारपूस करायची. रुग्णाला दवाखान्यात घेऊन जायचे. अॅडमिट करण्याची आवश्यकता असेल तर रुग्णाला जीपमध्ये घेऊन बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयाची शोधाशोध करायची आणि रुग्णाला अॅडमिट करूनच पुन्हा गावाकडे परतायचे, असा किशोरचा दिनक्रम आहे.
- चौकट
डबा पोहोचवतो, औषधही देतो...
रुग्णांना अॅडमिट करून किशोर थांबत नाही तर त्या अॅडमिट रुग्णाला त्याच्या घरून जेवणाचा डबा घेऊन जाण्याचे कामही तो करतो, तसेच वारंवार रुग्णालयात जाऊन रुग्णाला काही हवे-नको याचीही तो चौकशी करत असतो. गृह अलगीकरणात असणाऱ्यांना औषधे पोहोचविण्याची जबाबदारीही किशोरने सांभाळली आहे.
- चौकट
पाठीवर स्प्रे पंप घेऊन धाव
ज्या-ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल, त्या घरात स्वत: किशोर पाठीवर स्प्रे पंप घेऊन पोहोचतो. संपूर्ण घर तो सॅनिटाईझ करून देतो. गत दीड महिन्यात रात्री किंवा दिवसाही ज्या रुग्णाला गरज लागेल त्याच्यासाठी किशोर धाव घेतो.
- चौकट
मी माणसातच पाहिला देव...
किशोरचे कष्ट तसेच गावाविषयी त्याला असणारी तळमळ पाहता, बाजार समितीचे माजी सभापती दिवंगत हिंदुराव चव्हाण यांचा मुलगा शरद चव्हाण यांनी त्याला जीप दिली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी ही जीप वापरली जाते तर जमा झालेल्या लोकवर्गणीतून डिझेलचा खर्च भागवला जातो.
कोट
कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. आपण या मातीचे देणे लागतो, या भावनेतून मी गेल्या दीड महिन्यापासून ग्रामस्थांची सेवा करत आहे. गावातील कोणीही फोन केला की मी त्याठिकाणी पोहोचतो. गरज असेल तर रुग्णाला दवाखान्यात पोहोचवतो. अथवा घरी आवश्यक ती मदत करतो. मी माणसातच देव पाहिला आहे.
- किशोर साळवे
ग्रामस्थ, कोपर्डे हवेली.
फोटो : ०५ केआरडी ०२
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील किशोर साळवे हा युवक रुग्णांना दवाखान्यात घेऊन जातो.
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी