दारू दुकानांसाठी हवाय ४४ जणांना परवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:51 AM2021-02-25T04:51:43+5:302021-02-25T04:51:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या महामारीत अनेकांनी सुरू केलेले नवे व्यवसाय कोलमडू लागलेत. त्यामुळे नेमका कोणता व्यवसाय सुरू ...

Hawaii licenses 44 for liquor shops | दारू दुकानांसाठी हवाय ४४ जणांना परवाना!

दारू दुकानांसाठी हवाय ४४ जणांना परवाना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या महामारीत अनेकांनी सुरू केलेले नवे व्यवसाय कोलमडू लागलेत. त्यामुळे नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा, या विवंचनेत अनेकजण आहेत. कोरोनाची परिस्थिती निवळेपर्यंत थोडे दिवस आणखी थांबू, असा विचार नव्या व्यवसायात पदार्पण करणाऱ्यांच्या मनात घोळत असतानाच, याला मात्र एक व्यवसाय अपवाद ठरलाय. तो म्हणजे दारू पाजण्याची दुकाने. (अर्थात दारू दुकानाचा परवाना).

जिल्ह्यात गत वर्षभरापासून कोरोनामुळे भल्याभल्यांची आर्थिक घडी विस्कटलीय. ज्यांचा व्यवसायात चांगला जम बसला होता, ते व्यवसायही ढबघाईला आले. त्यामुळे गतवर्षात फारसे कोणी नव्या व्यवसायात पर्दापण केले नाही. परंतु सर्वाधिक नव्या व्यवसायाला मागणी झाली ती दारू दुकानाच्या परवान्यांची. एरवी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्षाला २५ ते २६ अर्ज दारूची नवी दुकाने सुरू करण्यासाठी येत होते. मात्र, कोरोनाच्या संकट काळात गतवर्षी तब्बल ४४ जणांनी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवाना मागितलाय. हा आकडा पाहून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारलेत.

विशेष म्हणजे संबंधित अर्जदारांना आपापल्या कार्यक्षेत्रातील पालिका असो की ग्रामपंचायतींनी नाहरकत दाखलासुद्धा दिलाय. खरं तर या व्यवसायात बक्कळ पैसा असतो, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे तरुण पिढीही या नव्या व्यवसायात उतरण्यासाठी आतूर झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या दुकानाच्या परवान्यासाठी अत्यंत किचकट प्रक्रिया असूनही अनेकजण सहिसलामत दारू पाजण्याचा परवाना मिळवितात. गतवर्षी परमीट रूमसाठी ३८ जणांनी अर्ज केले आहेत. यातील ८ परवाने मंजूर झाले आहेत. तसेच बिअर शॉपीसाठी ६ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये २ जणांचा परवाना मंजूर झाला. उर्वरित अर्जांचेही परवाने कागदपत्रांतील त्रूटी दूर केल्यानंतर मंजूर होतीलच, पण रोज नवे अर्ज परवान्यासाठी येत आहेत. त्यामुळे हा आकडा यंदा पन्नासच्या वर जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळातही एकमेव तारणारा हा व्यवसाय अनेकांच्या जिव्हाळ्याचा ठरलाय.

चौकट : सर्व मिळून किती दुकाने...

जिल्ह्यात परमीट रूम-४६०

वाइन शॉप - ४५

देशी दारू दुकाने - ११२

बिअर शॉपी - ९४

................................

चौकट : ना वास्तूशास्त्र, ना मुहूर्त!

दारूची दुकाने सुरू करताना ना वास्तूशास्त्र, ना मुहूर्त पाहण्याची गरज नसते. असे उपरोधिक बोलले जाते. तरीसुद्धा ही दुकाने हाऊसफुल्ल चालतात. अंधारात, अडगळीत, कोसोदूर हे शब्द या दुकानाच्या व्यवसायात मोडत नाहीत. कुठेही ही दुकाने सुरू केल्यास दुकानदारांची भरभराट होते. दारूच्या दुकानासमोर असलेल्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. असाच एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. महापुरातून वाट काढत लोक दारूच्या दुकानापर्यंत ये-जा करत होते.

हा फोटो पाहून अडचणीत असलेला भरभराटीचा धंदा अशी फोटो कॅप्शनही अनेकांनी दिली होती.

Web Title: Hawaii licenses 44 for liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.