अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजीचा आजार जडलाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:22+5:302021-03-28T04:37:22+5:30

कऱ्हाड : निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करण्याचा आजार अविनाश मोहिते यांना जडलाय का? असा प्रश्न कृष्णाकाठी पडू लागला आहे. ...

Has Avinash Mohite contracted stunt disease in the run up to elections? | अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजीचा आजार जडलाय का?

अविनाश मोहितेंना निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजीचा आजार जडलाय का?

कऱ्हाड : निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करण्याचा आजार अविनाश मोहिते यांना जडलाय का? असा प्रश्न कृष्णाकाठी पडू लागला आहे. यंदाची वार्षिक सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी विरोधी गटाचे अविनाश मोहिते व सहकारीही उपस्थित होते. पाच वर्षांत संचालक मंडळाच्या सभेत सभासदांच्या प्रश्नांवर तोंड न उघडणारे अविनाश मोहिते वार्षिक सभेतही गप्प होते. सभेत गोंधळ करण्याची संधी न मिळाल्यानेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी केली आहे. त्यांनी अहवाल नीट वाचला असता तर त्यांना प्रश्नच पडले नसते, अशी टीका कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी केली आहे.

जगदीश जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘कारखान्याच्या २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील अहवालाबाबत काही प्रश्न असल्यास ते सभासदांकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार अविनाश मोहिते यांच्यासह अन्य सभासदांचे लेखी प्रश्न आले होते. या प्रश्नांपैकी सभेशी निगडी प्रत्येक प्रश्नांबाबत अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे, असे असतानाही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, असा कांगावा सुरू आहे. कारखान्याच्या डिस्टलरीच्या नफ्याबाबत प्रश्न विचारताना मोहिते यांनी तो अहवालात कुठल्या पानावर नमूद आहे, असा सवाल केला आहे. यावरून त्यांनी अहवाल वाचलाच नसल्याचे दिसते. कृष्णा कारखान्याच्या डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाख ११ हजार ३२२ रुपयांचा नफा झाल्याचे अहवालाच्या पान ६१ वर स्पष्टपणे नमूद आहे.

कृष्णा कारखान्याने गेल्या ५ वर्षात एफआरपी थकविलेली नाही, उलट सर्वाधिक दिली. यंदाचा हंगाम अजूनही सुरू आहे. तेव्हा हंगाम संपल्यानंतर आसपासच्या कारखान्यांशी सल्लामसलत करून शिल्लक एफआरपी अदा केली जाणार आहे. आधुनिकीकरणामुळे कारखान्याचा मोठा फायदा झाला आहे. मोहितेंनी अहवालातील आकडेवारी अभ्यासली तर त्यांच्या लक्षात येईल, की त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात प्रतिदिन सरासरी ६६०० मेट्रिक टन गाळप होत होते. जे आता प्रतिदिन सरासरी ७ हजार ६०० मेट्रिक टन गाळप होत आहे. म्हणजेच दररोज जवळपास १ हजार मेट्रिक टनाने गाळप वाढले आहे. शिवाय उताराही वाढला आहे. उतारा वाढला याचा अर्थ स्पष्ट आहे, की हंगामात १ लाख साखर पोती जास्त उत्पादित झाली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवर राजकीय आकसापोटी मोहिते वारंवार टीका करताना दिसतात. वास्तविक ट्रस्टसंबंधीचा त्यांचा प्रश्न कारखान्याच्या कामकाजाशी निगडीत नाही. तरीही त्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने, त्यांना मला आवर्जून सांगावेसे वाटते, की जरा स्वत:चा अभ्यास वाढवा. मुळात देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश थेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसमार्फत नीट परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार होतात. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे प्रवेश होत असताना त्याचा कोटा कारखान्यात ठराव करून निश्चित करा, असेही म्हणणेच हास्यास्पद आहे. त्यांना देशभरातील प्रवेशाची ही प्रक्रिया मान्य नसेल तर त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. सभा खेळीमेळीत झाल्याने मोहितेंना पोटशूळ उठला आहे. त्यांच्या मनातील खदखद पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बाहेर पडली आहे, अशी टीका जगदीश जगताप यांनी केली.

Web Title: Has Avinash Mohite contracted stunt disease in the run up to elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.